नाशिक – वाहतूक पोलिसांनी ना हरकत दाखला दिल्यामुळे शहरात रस्त्यावरील २९ आणि रस्त्यालगतची सहा अशी एकूण ३५ स्मार्ट वाहनतळे कार्यान्वित करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. सशुल्क तत्वावर ही वाहनतळे चालविण्यासाठी त्रयस्त्र यंत्रणेला दिली जातील. यासाठी महापालिकेने प्रस्ताव मागविण्याची तयारी सुरू केली आहे.

रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. वाहनतळाअभावी ही समस्या गंभीर स्वरुप धारण करत असल्याने वर्दळीचे ठिकाण, गर्दी आणि ना फेरीवाला क्षेत्राचा अभ्यास करून आकारास आलेल्या, पण करोनापश्चात ठेकेदाराच्या कार्यपद्धतीने बारगळलेल्या स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन करण्याचे महापालिकेने आधीच ठरवले होते. त्यानुसार रस्त्यावरील २९ आणि रस्त्यालगतची सहा अशा ३५ वाहनतळांसाठी जागा निश्चित करण्यात आली. याची यादी वाहतूक पोलिसांकडे पाठविण्यात आली होती. या यंत्रणेकडून ना हरकत दाखला मिळाल्याचे मनपातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

या वाहनतळात पूर्वी निश्चित झालेल्या वाहनतळांचाही अंतर्भाव आहे. तीन ते चार वर्षांपासून निश्चित झालेल्या जागा पडून आहेत. वाहनधारक त्यांचा वापर करतात. मात्र मनपाला उत्पन्न मिळत नाही. महापालिकेने अंदाजपत्रकात रस्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परीक्षण आणि विविध चौकातील रहदारी नियोजन व उपाय योजण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचा संकल्प सोडला आहे. ही वाहनतळे चालविण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेला दिली जातील. यासंबंधीचे प्रस्ताव लवकरच मागविले जातील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

बससाठी दोन वाहनतळ

महापालिकेच्या ३५ वाहनतळांच्या यादीत काही दुचाकींसाठी तर, बहुसंख्य दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी असणाऱ्या तळांचा समावेश आहे. बससाठी बी. डी. भालेकर मैदान आणि मुंबई नाका येथील मनपाची त्रिकोणी जागा या दोन वाहनतळांचा समावेश आहे.

Story img Loader