नाशिक : रंगांची उधळण आणि रहाडींमध्ये डुंबून नाशिककरांनी बुधवारी रंगपंचमीचा आनंद घेतला. रंगपंचमीनिमित्त शहरात विविध मंडळांनी वर्षानृत्यासाठी (रेन डान्स) व्यवस्था केली होती. या आधुनिक पद्धतीऐवजी परंपरेला प्राधान्य देणाऱ्यांनी जुन्या नाशिकमधील रहाडींमध्ये डुंबण्याचा आनंद घेतला. रंग, पिचकाऱ्या, रंगबेरंगी फुगे या सर्वांचा रंगपंचमी साजरी करताना वापर करण्यात आला. रंगपंचमीच्या साहित्य विक्रीमुळे बाजारपेठेतही आर्थिक उलाढाल होण्यास मदत झाली. नागपूर येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नाशिककरांची रंगपंचमी ऐतिहासीक असते. धुलिवंदनऐवजी रंगपंचमीला नाशिकमध्ये विशेष महत्त्व आहे. जुन्या नाशिकमध्ये पेशवेकालीन रहाडी आहेत. यंदा रंगपंचमीसाठी त्यापैकी सात रहाडी खुल्या झाल्या. यंदा शिवाजी चौक साती आसरा मंदिराजवळील रहाड कित्येक वर्षांनंतर डुंबण्यासाठी खुली झाली. दुपारी विधिवत पूजनानंतर सर्व रहाडी डुंबण्यासाठी खुल्या झाल्या. या रहाडी रंगाच्या पाण्याने भरण्यात आल्या होत्या. त्यात वनौषधींचाही वापर करण्यात आला. प्रत्येक रहाडीभोवती त्या त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षेची व्यवस्था केली होती. दुसरीकडे, कॉलेजरोड, मेनरोड, रविवार कारंजा, भद्रकाली, पंचवटी परिसरात ठिकठिकाणी थिरकत्या गाण्यांच्या चालीवर वर्षानृत्याचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी फक्त महिलांसाठी रंगपंचमीची व्यवस्था करण्यात आली होती.
बाजारपेठेत मोदी पिचकारी, योगी पिचकारी, मोटुपतलु पिचकारी असे विविध प्रकार १५ रुपयांपासून पुढे दीड हजार रुपयांपर्यंत उपलब्ध होते. नैसर्गिक रंग १०० रुपये किलो दराने विकले गेले. सिकंदर ही रंगाची बाटली ६० रुपये, फवारणी रंग १०० रुपये अशी विक्री झाली. पर्यावरणपूरक टिळा होळीसाठी नैसर्गिक रंगांना चांगलीच मागणी दिसून आली. याशिवाय पाण्याचे फुगे तसेच सोनेरी रंगांचा वापर झाला. युवकांचे गट दुचाकीवरुन रस्त्याने फिरताना दिसून आले. दुपारनंतर शहरातील सर्व रस्ते रंगीत झाले होते.
दरम्यान, जुन्या नाशिमधील अमरधाम रस्त्यावरील शिवाजी चौकात असलेली रहाड कित्येक वर्षानंतर खोदण्यात आली. रंगपंचमीसाठी ही रहाड खुली करण्यात आली. नागपूर येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. भद्रकाली परिसरात रहाडीच्या निमित्ताने जमणारा जमाव पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी अडथळे टाकण्यात आले होते. मेनरोड, रविवार कारंजा, दहीपूल, भद्रकाली या भागाकडे येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. प्रत्येक रहाडीच्या ठिकाणी प्रभारी पोलीस निरीक्षकासह इतर कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त, राज्य राखीव दलाचे जवान असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंडळाला स्वयंसेवक नियुक्त करण्याची सूचना देण्यात आली होती. प्रत्येक रहाडीजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. दंगल नियंत्रण पथकही तैनात होते. भद्रकाली परिसरात पोलिसांकडून विशेष दक्षता बाळगण्यात आली.
जिल्ह्यातील येवला येथे दुपारनंतर रंगांच्या सामन्यांना सुरुवात झाली. हे सामने पाहण्यासाठी इतर ठिकाणचे नागरिकही येवला येथे आले होते.