अविनाश पाटील, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: जिल्ह्यातील करोनाचे केंद्र झालेल्या मालेगावमध्ये रूग्ण संख्या पाचशेपुढे गेल्याने नाशिकसह शेजारील धुळे या शहरांनी धसका घेतला असून या शहरांमध्ये मालेगावचे करोना रूग्ण तपासणीसाठी आणण्यास मोठय़ा प्रमाणावर विरोध होऊ लागला आहे. धुळे येथे सर्वपक्षियांनी, तर नाशिक येथे भाजपने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपला विरोध दर्शविल्याने मालेगाव महापालिका प्रशासन आणि शहरातील राजकीय मंडळी अस्वस्थ झाली आहेत.

अतिशय दाट लोकवस्ती हे मालेगाव शहराचे वैशिष्टय़े. सहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या शहराचे मोसम नदीमुळे दोन भाग पडले आहेत. कॅम्प वगळता मुस्लिमबहुल पूर्व भागात करोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ प्रशासनासाठी चिंताजनक ठरली आहे. विविध प्रकारचे प्रयत्न करूनही मालेगावची रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने अलिकडेच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी नाशिकची जबाबदारी महापालिका आयुक्त, येवल्याची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे, तर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यावर मालेगावची जबाबदारी सोपविण्याची सुचना केली. प्रशासनाच्या वतीने अशा प्रकारे प्रयत्न होत असतांना मालेगावकरांची बेफिकिरी आणि प्रशासकीय प्रयत्नांना सहकार्य न करण्याची वृत्ती यामुळे आजार बळावत येत असल्याचे दिसून येत आहे. आशा सेविकांना असहकार्य, डॉक्टर आणि पोलिसांना मारहाणीचे प्रकारही घडले आहेत. मालेगावमध्ये बंदोबस्तास आणि नाशिकमध्ये राहण्यास असलेल्या दोन-तीन पोलिसांमुळे नाशिकमध्येही बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. काही दिवसांपर्यंत सुरक्षित असलेल्या नाशिकला मालेगावच्या संबंधामुळे जर धोका निर्माण होत असेल तर मालेगावच्या बाधितांना नाशिकमध्ये येण्यास रोखण्याचा मतप्रवाह व्यक्त होऊ लागला. परिणामी, मालेगावच्या करोना रूग्णांना नाशिकमध्ये आणू नका, अशी भूमिका शहर भाजपने घेतली आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची शहराध्यक्ष गिरीश पालवे, महापौर सतीश कुलकर्णी, आ. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे यांनी भेट घेत आपली भूमिका मांडली. मालेगावमधील वाढती रुग्णसंख्या नशिककरांसाठी डोकेदुखी झाली असल्याचे भाजपने म्हटले आहे. प्रशासनाने मालेगाव येथील करोना बाधितांना आडगाव येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी आणण्यास आपला विरोध असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. बाहेरील रुग्ण नाशिकला आणून संसर्ग वाढल्यास याचा त्रास नाशिकला होणार आहे. नाशिकमधील अनेक लोकवस्त्या या दाट स्वरूपाच्या असून येथे  करोनाचा लवकर फैलाव होऊ  नये यासाठी आपला विरोध असल्याचे शहराध्यक्ष पालवे, महापौर कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, धुळेकरांनीही मालेगावचे रूग्ण शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी आणण्यास विरोध केला आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांना भाजपसह शिवसेना तसेच इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे. मालेगाव शहरासह तालुकाही ज्यांच्या मतदारसंघात येतो, असे भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी तर मालेगावची जनता प्रशासनाचे ऐकत नसल्याने सैन्य आणण्याची मागणी केली आहे. मालेगावच्या रूग्णांवर तिथेच उपचार करावेत, त्यासाठी भाजप सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेने मालेगावचे रूग्ण धुळ्यात आणण्याचा प्रयत्न झाल्यास रस्ता अडविण्याचा इशारा दिला आहे.

रूग्ण कोणताही असो, त्याच्यावर उपचार होणे आवश्यक आहे. हा मालेगावसाठी पडता काळ आहे. परंतु, सर्व मालेगावकर एकजुटीने करोनाचे संकट परतवून लावतील.

-दादा भुसे (कृषिमंत्री)

नाशिकमध्ये मालेगावसह इतर भागातून करोना बाधित रूग्ण अवैधरित्या येत आहेत. त्यामुळे सुरक्षित अशा नाशिक शहराला धोका निर्माण झाला आहे. नाशिक अशा प्रकारे बाधित होत असेल, तर ते शहरासाठी योग्य नाही.

– सतीश कुलकर्णी  (महापौर, नाशिक)

मालेगावचे रूग्ण धुळ्यात आणण्याचा निर्णय अजून झालेला नाही. मालेगावसारखी आपत्ती झेलण्यासाठी आजच्या घडीला धुळे तेवढे सक्षम नाही. मालेगावच्या रूग्णांविषयी शासनाकडून जो निर्णय होईल, त्याआधी आमच्याशी चर्चा होईल. अद्याप अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. माझ्यापर्यंत तसा प्रस्तावही आलेला नाही.

-संजय यादव (जिल्हाधिकारी, धुळे)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People oppose shifting patients from malegaon to dhule and nashik city zws
Show comments