नाशिक : गुढी पाडव्यानिमित्त शहरात आयोजित जवळपास सर्वच स्वागत यात्रा आणि इतर कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. सलग काही दिवस सार्वजनिक स्थळी कार्यक्रम घेऊ इच्छिणाऱ्यांनी त्याचे स्वरूप सांगण्याची तसदी न घेतल्यास तसेच चर्चा न करता परवानगी दिली जाणार नसल्याचे सूचित करण्यात आले. कार्यक्रमांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी लवकरच आभासी व्यवस्था कार्यान्वित करण्यात येणार आहे.
नववर्षांनिमित्त गोदा घाटावर आयोजित कार्यक्रम पोलिसांच्या दप्तर दिरंगाईवरून रद्द केल्याचे आयोजकांनी जाहीर केल्यानंतर गदारोळ उडाला होता. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी नाशिककरांना त्रास होणार नाही, याचा विचार करून परवानगीचे धोरण राबविले जात असल्याचे म्हटले होते. कार्यक्रम घेऊ इच्छिणारे चर्चेला देखील आले नसल्याचा आक्षेप नोंदविला गेला. या विषयावर बुधवारी पालकमंत्री छगन भुजबळ आणि पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े यांची बैठक झाली. त्यावेळी परवानगींची सद्यस्थिती आयुक्तांनी मांडली. बैठकीनंतर भुजबळ यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी कुणाचीही परवानगी अडविली नसल्याचे नमूद केले. ९० टक्के कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी दिलेली आहे. ज्यांचे सलग दोन-तीन दिवस कार्यक्रम होते, त्यांना चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. विरांची मिरवणूक आणि रंगपंचमीनिमित्त काही मंडळांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा पोलीस पुनर्विचार करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
कार्यक्रमांना परवानगी देण्यात कालापव्यय होत असल्याचे आरोप होत असल्याने पोलिसांनी ही प्रक्रिया सुलभ करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. कार्यक्रम परवानगीसाठी पोर्टलवरून आभासी पध्दतीने अर्ज करता येईल. तशी व्यवस्था करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे आयुक्त पाण्डय़े यांनी सांगितले.
असेही संकेत
कार्यक्रम परवानगीसाठी पोलीस आयुक्तालयात एक खिडकी योजना कार्यरत आहे. ही व्यवस्था कायम ठेऊन आभासी व्यवस्था लवकरच अस्तित्वात येईल. त्यामुळे अर्ज देण्यासाठी कार्यालयात यावे लागणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. चर्चा न करता परवानगीची अपेक्षा बाळगणाऱ्यांना नकार दिला जाणार असल्याचे संकेत देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा