बालगीतातील ‘शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा.’ या गीताची प्रत्यक्ष अनुभती देणारे पाळीव प्राण्यांचे संमेलन’ रविवारी द नाशिक कॅनाईन क्लब, महाराष्ट्र कॅट फेडरेशन आणि पेट प्रॅक्टीशनर असोसिएशन ऑफ नाशिक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनात कुत्रे, मांजरी या पाळीव प्राण्यांसह काही अनोखे वैशिष्टय़ असलेले प्राणी संमेलनात पहायला मिळणार आहेत. या शिवाय प्राण्यांची निगा, देखभाल याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संमेलनास प्रशांत दामले, संजय मोने या दिग्गज अभिनेत्यांच्या उपस्थितीत ‘सेव्ह द डॉग – भो भो’ या मराठी सिनेमाची माहिती देण्यात येणार आहे.
लवाटेनगरच्या ठक्कर्स डोम येथे सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत हे संमेलन होईल. संमेलनाच्या माध्यमातून पाळीव प्राणी आणि पक्ष्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, रस्त्यावरील मोकाट जनावरांबद्दल नागरिकांची जबाबदारी समजावून सांगणे, लोकांना त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार कोणता पाळीव प्राणी सांभाळता येईल याची माहिती देणे, मोकाट जनावरांसाठी काही नाशिकमधील सामाजिक संस्था काम करत आहे. त्यांचे कार्य समाजासमोर आणण्यासाठी संमेलनाच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहेत. संमेलनाचे हे चौथे वर्ष असून यंदा कुत्रे, मांजर, पक्षी आणि रुबाबदार घोडे या तीन विभागात संमेलन होईल. पाळीव प्राण्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, त्याविषयी प्राथमिक शिक्षण देणे, मोकाट जनावरांसाठी ज्या सामाजिक संस्था काम करत आहे त्यांचे काम पुढे आणणे यासाठी संमेलन महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे.
यावेळी कॉकेशियन शेफर्ड, सेंट बर्नार्ड, रॉटविलर, जर्मन शेफर्ड, ग्रेट डेन यासह भारतीय वंशाचे डॉग्स ब्रीड्सची माहिती संमेलनात दिली जाईल. विविध प्रकारच्या ५२ प्रजातींचे कुत्रे सहभागी होणार असून २६ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. मांजर, पक्षी यात पार्शियन कॅट, पंच फेस पार्शियन कॅट, सयामी कॅट, अतिशय दुर्मीळ असे ऐक्झोटिक शॉर्ट हेयर सहभागी होतील. त्याकरीता ८० स्पर्धकांनी नोंदणी केली असून विविध प्रजातीच्या मांजरी या ठिकाणी पहायला मिळतील. पक्षीप्रेमींसाठी पाच फूट लांब सरडा, ऑस्ट्रेलियन उडणारी खार, मकाऊ, डौलदार कोंबडय़ांचे प्रकार, झेब्रा फिन्चेस, निरनिराळ्या प्रकारचे कॉकटेल, अंगुरा ससे यासह अन्य वैशिष्टयपूर्ण पक्षी आहेत. घोडय़ाच्या गटात उमद्या, अचपळ, अबलख घोडय़ांची उपस्थिती सर्वाचे लक्ष वेधणारी ठरेल. मारवाडी घोडे, काठियावाडी, सिंधी, पंजाबी, पोनी विविध जातीचे रुबाबदार घोडे आहेत. संमेलनात प्राण्यांचे डॉक्टर उपस्थित राहणार असून पाळीव प्राण्यांच्या देखभालीविषयी माहिती देणार आहेत. संमेलनस्थळी प्रत्येक विभागात माहितीफलक लावण्यात येणार असून अधिकाधिक नागरिकांपर्यंत ‘रिस्पोन्सिबल पेटिंग’ ही कल्पना पोहचेल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. संस्थेच्यावतीने १२ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी व पालकांना संमेलनासाठी नि:शुल्क निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी ‘सेव्ह द डॉग – भो भो’ या पाळीव प्राण्यांसंदर्भातील मराठी चित्रपटाची प्रशांत दामले, सुबोध भावे, शरद पोंक्षे, संजय मोने, सौरभ गोखले, अनुजा साठे, किशोर चौगुले आदींच्या उपस्थितीत माहिती दिली जाईल.

Story img Loader