धुळे – शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १० जुलै रोजी धुळे येथे कार्यक्रम नियोजित असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली आहे.
शासन आपल्या दारी उपक्रमाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकण, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रेड्डी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, प्रत्येक विभागाने या कार्यक्रमात प्रत्यक्ष लाभ देणाऱ्या लाभार्थ्यांची संपूर्ण नाव व पत्तासह अद्ययावत माहिती त्वरीत सादर करावी, मुख्य कार्यक्रमाच्या स्थळी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचे दालन लावावे, दालनात संपूर्ण योजनेची माहिती व आवश्यक अर्ज लाभार्थ्यांना उपलब्ध करून देवून शक्य झाल्यास लाभार्थ्यांना जागेवर लाभ देण्यात यावा, यापूर्वी अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांच्या अर्जाची त्रुटीची पूर्तता त्वरीत करावी, अधिकाधिक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यात येवून जास्तीत जास्त लाभार्थी उपस्थित राहण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली