नाशिक – प्रयागराज कुंभमेळ्यातील दुर्घटना लक्षात घेता त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थात गर्दी होऊ नये, याकरिता त्र्यंबकलगतच्या गोदावरी नदीवर नवीन घाट आणि कुंड उभारण्यात येणार आहेत. आखाड्यांच्या देव-देवतांचे अमृतस्नान कुशावर्त तीर्थात होईल. साधू-महंत नवीन कुंडात स्नान करतील, असे नियोजन करण्याचे निश्चित झाले. गोदावरी नदीच्या स्वच्छतेसह ती कायमस्वरुपी प्रवाही राखण्यासाठी काळजी घेतली जाणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे भेट देऊन साधू-महंतांशी स्वतंत्र बैठकांद्वारे चर्चा केली. कुंभमेळ्यात भाविकांची तिप्पट गर्दी होऊ शकते. त्र्यंबकेश्वर शहर आणि कुशावर्त तीर्थासह परिसरात अतिशय कमी जागा आहे. गर्दी नियंत्रित करणे अवघड होईल. कुंभमेळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी शैवपंथीय आखाड्यांंनी अतिरिक्त नियोजनाचा आग्रह धरला. चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना घडू नये, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. भाविकांना स्नान करणे सुलभ व्हावे म्हणून गोदावरी नदीवर नऊ किलोमीटर लांबीचे नवीन घाट बांधले जातील. नवीन कुंडात साधू-महंतही स्नान करतील. अन्य तलाव व कुंडांसह घाटांची स्वच्छता केली जाईल, असे महाजन यांनी नमूद केले.
नाशिकमध्ये ७०० एकर जमिनीचे संपादन
नाशिक शहरात कुंभमेळ्यासाठी ७०० एकर जागा कायमस्वरुपी संपादित करण्याची योजना तयार करण्यात आल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. प्रयागराज कुंभमेळ्यानंतर नियोजनात मोठे फेरबदल होत आहेत. साधुग्रामसाठी प्रारंभी गृहीत धरलेल्या जागेचे क्षेत्रही वाढविण्यात आले. नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ पावसाळ्यात असतो. आखाडे खालसा आणि यात्रेकरुंना राहण्यासाठी पुरेशी जागा मिळावी, यासाठी अतिरिक्त जमीन राखीव ठेवली जाणार आहे.