अस्तित्वातील मलशुध्दीकरण प्रकल्प (एसटीपी) अद्ययावत करण्यासह मखमलाबाद आणि कामटवाडा येथे दोन नवीन मलजल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची तयारी महानगरपालिकेने केली आहे. नमामि गोदा प्रकल्पासाठी सल्लागार कंपनीने शहरात मलजल वाहिनीचे ३० टक्के सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. जीआयएस मापनाचे काम प्रगतीपथावर आहे.
सोमवारी राजीव गांधी भवन या मनपा मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमितीची बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन अनेक निर्णय घेण्यात आले. गटारीचे पाणी प्रक्रिया न करताच थेट गोदापात्रात जात असल्याची तक्रार वारंवार केली जाते. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेने मलजल शुध्दीकरण केंद्रांची क्षमता विस्तारण्याचे नियोजन केले आहे. त्या अंतर्गत तपोवन, आगरटाकळी, चेहडी, पंचक ही चार मलजल शुद्धीकरण केंद्र अद्ययावत करण्याच्या कामाचे सविस्तर प्रकल्प अहवाल एनआरसीडी (राष्ट्रीय नदी संवर्धन विभाग) यांच्याकडे सादर झाले आहेत. तपोवन आणि आगर टाकळी या दोन केंद्राची सुधारणा करण्यास शासनाच्या तांत्रिक समितीची मंजुरी दिली असून ते केंद्राच्या अमृत २.० योजनेतही प्रस्तावित आहे. मखमलाबाद, कामटवाडा येथे दोन नवीन मलजल शुद्धीकरण प्रकल्प उभारणार असल्याची माहिती मनपाचे अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली.
हेही वाचा >>>नाशिक: आर्टिलरी सेंटरजवळ बिबट्या जेरबंद
बैठकीत उपायुक्त (गोदावरी संवर्धन कक्ष) डॉ. विजयकुमार मुंढे यांनी प्रास्तविक केले. गोदावरी आणि उपनद्यांचे प्रदूषण थांबविण्यासाठी विविध मुद्यांवर चर्चा झाली. बैठकीत अशासकीय सदस्य राजेश पंडित, निशिकांत पगारे यांच्यासह उपप्रादेशीक अधिकारी (एमपीसीबी) अमर दुर्गुळ, विभागीय माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, उपायुक्त करुणा डहाळे, शहर अभियंता शिवकुमार वंझारी, स्मार्ट सिटीचे सुमंत मोरे, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे आदी उपस्थित होते.
पर्यावरणपूरक मित्र इमारत, सोसायटी पुरस्कार
पावसाचे पाणी साठवून त्याचा योग्य वापर करणाऱ्या अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंगची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या सोसायटींना पर्यावरणपूरक मित्र इमारत आणि पर्यावरणपूरक मित्र सोसायटी (गृहनिर्माण संस्था) असे पुरस्कार महानगरपालिका देणार आहे. त्यासाठी मनपाच्या संकेतस्थळावर गोदावरी संवर्धन कक्षाच्या लिंकवर १५ मेपर्यंत माहिती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छ झोपडपट्टी अशीही पुरस्कार योजना लवकरच राबविली जाईल, असे आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.
हेही वाचा >>>सापडलेला भ्रमणध्वनी परत करणे बेतले जीवावर, मारहाणीत मृत्यू , दोन जण ताब्यात
कापडी पिशव्यांना प्रोत्साहन
शहरात प्लास्टिक बंदी मोहिमेच्या अमलबजावणीसाठी प्रयत्न होत असले तरी आजही अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसतो. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आता कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्यासाठी बचत गटांना बाजारपेठ वा तत्सम ठिकाणी कापडी पिशव्या उपलब्धतेसाठी यंत्र (वेंडींग यंत्र) बसविण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. या पिशव्यांवर प्लास्टिक बंदीचा मजकूर आणि मनपाचे बोधचिन्ह असणार आहे.