नाशिक – या वर्षात जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाले असून सध्या धरणांमध्ये उपलब्ध साठ्यात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन पुढील १० महिने अर्थात ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत पुरेल, यादृष्टीने गांभिर्याने नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. वेगवेगळ्या विभागांच्या नळ पाणी पुरवठा योजना, गुरांसाठी पाण्याची व्यवस्थाही करावी लागेल. यानंतर त्या त्या भागात शिल्लक पाण्याचा कृषी सिंचनासाठी विचार करता येणार आहे. मराठवाड्यातील जायकवाडीसाठी जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडावे लागणार आहे. १५ ऑक्टोबर रोजीच्या जलसाठ्याच्या आधारावर हा निर्णय होईल. जिल्हास्तरीय आढावा बैठक काही विषयांवर चर्चा करून आटोपती घेण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हाधिकारी कार्यालयात धरणांतील उपलब्ध पाणीसाठा व नियोजन, पाणी व चारा टंचाई आढावा बैठक पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या संदर्भात तीनवेळा बैठका होऊनही योग्य नियोजन झाले नसल्याने भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. पाऊस कमी झाल्याने धरणांत पाणीसाठा कमी आहे. परतीचा पाऊसही पुरेसा झालेला नाही. धरणातील पाणीसाठा लक्षात घेता शेतकरी हिताला प्राधान्य देण्यासाठी उपाय गरजेचे आहे. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी व चारा या महत्वाच्या बाबी असून भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन करणे निकडीचे आहे. ज्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे, त्याचाही समावेश नियोजनात करावा लागणार आहे. जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी समवेत संयुक्तपणे बैठक घेऊन शेतकरी व नागरिकांचे प्रश्न लक्षात घेऊन आवश्यक उपाय योजना करावी, असेही भुसे यांनी सूचित केले.

हेही वाचा >>>धुळे जिल्ह्यात मनसेचे टोल नाक्यावर आंदोलन, टोल न भरता वाहनांची ये-जा

परतीचा पाऊस काही भागात चांगला झाल्यामुळे तेथील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तूर्तास सुटला आहे. परंतु, सिन्नर तालुक्यात चारा टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. टंचाई स्थितीत पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेऊन काटकसरीने वापर झाला पाहिजे. कृषी सिंचनासाठी पाणी देतांना त्या त्या भागातील फळबागा व इतर पिकांना, पिकांचे प्रकार, गरजेनुसार पाणी द्यावे, असे ते म्हणाले. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, प्रा.देवयानी फरांदे, नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आदी उपस्थित होते.

पाण्यावरून वाद लावण्याचे उद्योग

चणकापूर, पुणेगाव आणि दरसवाडी धरणातून आवर्तन देताना पाटबंधारे विभागाचे अधिकारी दुजाभाव करतात. पुणेगावमधून ३०० दशलक्ष घनफूट पूरपाणी सोडून ते शेवटच्या गावात पोहोचले नाही. या विभागाकडून गावागावात वाद लावण्याचे काम सुरू असल्याचा आरोप आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केला. पुणेगावचे पाणी कालव्यात ६० किलोमीटरपर्यंत पोहोचले आहे. तीन किलोमीटर राहिले. पुणेगावचे किती पूरपाणी मिळणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही बाब समोर आल्यावर भुसे यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. कालवे स्वच्छ करा, कचरा काढून टाका, असे त्यांनी सूचित केले. उर्वरित दोन, तीन किलोमीटर पाणी गेले नाही तर मेहनत वाया जाईल. आहे त्या पाण्याची नासाडी होईल. उद्दिष्ट साध्य करता येणार नसल्याचे बैठकीत सूचित करण्यात आले.