नाशिक – जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळांमध्ये नोंद असलेले तसेच शाळाबाह्य अशा एक ते १९ वयोगटातील एकूण १२ लाख ३६ हजार ३४९ बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्ह्यात १३ फेब्रुवारी रोजी सर्व सरकारी, खासगी शाळा, अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.
बालकांना जंतनाशक गोळी प्रत्यक्ष खाऊ घातली जाणार आहे. गोळी दिलेल्या प्रत्येक बालक लाभार्थ्याची नोंद ठेवली जाणार असून याबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली शीघ्र कृती दलाची बैठक सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत जंतनाशकदिनी बालकाला गोळी खाऊ घातल्यानंतर गुंतागुंत झाल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे संदर्भित करण्याबाबतचे आदेश देण्यात आले. जिल्ह्यातील ५२३२ अंगणवाड्या, ५०३२ सरकारी व खासगी शाळांमध्ये जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. ज्यांना १३ फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी मिळाली नसेल, त्यांना २० फेब्रुवारी रोजी देण्यात येणार आहे.