लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : तपोवनात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्याचा आराखडा लवकरच तयार करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात या केंद्रासाठी १० हेक्टर जागा उपलब्ध करून दिली जाईल. नंतर टप्प्याटप्प्याने त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

मनपा आयुक्त मनिषा खत्री यांची नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (निमा) अध्यक्ष आशिष नहार आणि अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (आयमा) अध्यक्ष ललित बूब यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली. औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी आयुक्त खत्री यांनी कायमस्वरुपी प्रदर्शन केंद्राच्या आराखड्यात वाहनतळ, वीज, पाणी, अग्निशमन सुविधांविषयी विचार विनिमय केला.

उद्योगांना मालमत्ता कर कमी करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. उद्योजकांना व्यावसायिक दराने मालमत्ता कर लागू होता. तो आता औद्योगिक दराने करण्याचा निर्णय झाल्याचे आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले. उद्योजकांनी मांडलेल्या औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पथदीप, स्वच्छतागृह, वाहतूक, अनधिकृत थांबे, रस्ते, पथदीप, घंटागाडी आदी विषयांवर तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. एलबीटीचा परतावा लवकरच दिला जाईल. सांडपाणी व्यवस्थापन केंद्र व सामाईक रासायनिक पाणी प्रक्रिया केंद्राच्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाणार आहे. औद्योगिक वसाहतींसाठी मनपाच्या आर्थिक अर्थसंकल्पात विशिष्ट आर्थिक तरतूद करण्याची तयारी दर्शविण्यात आली.

अंबड वसाहतीतून प्रारंभ

सातपूर आणि अंबड औद्योगिक क्षेत्रातील सर्व रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात अंबड वसाहतीतील एका प्रमुख रस्त्याचे काम एप्रिलमध्ये सुरू करण्यात येणार आहे.