नीलेश पवार, लोकसत्ता
नंदुरबार: नंदुरबारच्या कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी शासनाने चार वर्षांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले. परंतु, चार वर्षात दोन वेळा करार होऊनही जिल्हा सामान्य रुग्णालय हस्तांतरीत करुन घेण्यात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन अपयशी ठरले आहे. परिणामी एकीकडे आरोग्य विभागाने राज्यस्तरावरुन सामान्य रुग्णालयाच्या सेवा कमी केल्या तर, दुसरीकडे वैद्यकीय महाविद्यालयाच्या त्या सेवाच सुरु झाल्या नसल्याने या वादात रुग्णांचे हाल होत आहेत.
शहरात राजकारण्यांनी श्रेयवादाचे कित्ते गिरवत मोठा गाजावाजा करुन वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करुन घेतले. महाविद्यालयास चार वर्ष झाली असली तरी वैद्यकीय महाविद्यालय स्वत: समस्यांच्या गराड्यात अडकल्याचे चित्र आहे. वैद्यकीय महाविद्यालयाला जागा नसल्याने सुरुवातीपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात हे महाविद्यालय सुरु करण्यात आले. यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यात तीन वर्षांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालय हस्तांतरणाचा करार देखील झाला. परंतु, अजूनही हा करार अस्तित्वात आलेला नाही.
हेही वाचा… धुळे: साहेब, पाया पडतो पण पाणी सोडा…! माजी आमदाराची धुळे जिल्हाधिकार्यांकडे मागणी
जिल्हा रुग्णालय हस्तांतरीत झाले नसताना दुसरीकडे आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यात कागदोपत्री करार झाल्याने, आरोग्य विभागाने राज्यस्तरावरुन पुरविल्या जाणाऱ्या बाह्यस्त्रोत सेवा जिल्हा रुग्णालयासाठी बंद केल्या आहेत, यात महा प्रयोगशाळा, साफसफाई, जैववैद्यकीय अशा नानविध सेवा बंद करण्याचे पत्रच जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे तुटपुंज्या व्यवस्थेत जिल्हा रुग्णालय रुग्णसेवा देत आहे. चार वर्षात वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक विषय तज्ज्ञांनी जिल्हा रुग्णालयात सेवा देणे क्रमप्राप्त होते. मात्र त्यातील पाच ते सहा डॉक्टर वगळता कोणीही हजर राहत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे घरी बसून पगार खाणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या चौकशीची गरज व्यक्त होत आहे.
हेही वाचा… नाशिक: आजपासून नाफेडकडून कांदा खरेदी; राज्यात तीन लाख मेट्रिक टनची खरेदी होणार
चार वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २१ पैकी १९ प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. औरंगाबादवरुन प्रतिनियुक्तीवर आलेल्या एका अधिकाऱ्याने दोन वर्षे अधिष्ठाता म्हणून कारभार सांभाळला. विशेष म्हणजे त्याच्याकडे नंदुरबारसह अंबेजोगाईचा देखील पदभार होता. चार वर्षात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी विषयतज्ज्ञच नसतील तर मग वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभाराबाबत न बोललेले बरे. जिल्हा रुग्णालयच हस्तांतरीत झाले नसेल तर वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य शिक्षणाचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवेचे प्रात्यक्षिक कुठे मिळत असेल? या गोंधळाचा परिणाम जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सुरु झालेले वैद्यकीय महाविद्यालयच समस्यांचे माहेरघर ठरत असून याबाबत वरिष्ठ स्तरावरुन तातडीने कार्यवाही होणे जरुरीचे झाले आहे.
हस्तांतरण प्रक्रियेसाठी करारनामा झाला होता. परंतु, त्याची मुदत संपल्याने तीन वर्ष मुदतवाढ मिळाली आहे. यानंतर आम्ही एक समिती तयार केली असून ही समिती हस्तांतरणविषयकल समस्यांचे निराकरण करेल. सोबतच वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व पदे भरण्याबाबत देखील शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. – डॉ. अरुण हुमणे (अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार)
वैद्यकीय शिक्षण विभागाला जिल्हा सामान्य रुग्णालय हस्तांतरीत करायला तयार आहोत. आमच्या बाजूने कुठलीही अडचण नाही. विषय तज्ज्ञांच्या रिक्त असलेल्या जागांवर वैद्यकीय महाविद्यालयातील विषय तज्ज्ञांनी सेवा देण्यासंदर्भात मंत्री आणि जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली होती. परंतु, यासाठी प्रतिनियुक्तीवर दिलेले अनेक विषयतज्ज्ञ परत गेले असून चार ते पाच जणच आता जिल्हा रुग्णालयात सेवा देत आहेत. – डॉ. चारुदत्त शिंदे (जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार)