नाशिक – बनावट मालक उभा करून शहरात भूखंडाची परस्पर विक्री करण्याचे अनेक प्रकार झाले असताना मखमलाबाद परिसरातील एका भूखंडाची अशाप्रकारे विक्रीचा डाव सहदुय्यम निबंधक (वर्ग दोन) शरद दवंगे यांच्या दक्षतेमुळे फसला. मखमलाबाद शिवारातील २८० चौरस मीटर क्षेत्राचा भूखंड बनावट मालकाद्वारे विक्रीचा संशयितांचा डाव होता. यासंबंधीचा दस्त नोंदणीवेळी लिहून देणाऱ्याचे नाव गोपाळकृष्ण नायर असे असताना संशयिताचे बोलणे आणि स्वाक्षरी गुजरातींसारखी आढळली. संशयिताचा एक साथीदार ओळख पटविण्यासाठी पुढे आला. मात्र ओळखीची खात्री न पटल्याने दवंगे यांनी दस्त नोंदणीला नकार देऊन चार संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

सहदुय्यम निबंध कार्यालय क्रमांक सातमध्ये हा घटनाक्रम घडला या संदर्भात सहदुय्यक निबंधक शरद दवंगे यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून कालिदास परमार (बनावट नाव गोपालकृष्ण नायर), रवी दोंदे, संतोष जाधव आणि हर्षद सोलापूरकर यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागेचे भाव जसे गगनाला भिडले, तसे या क्षेत्रातील गैरप्रकारांमध्ये वाढ झाल्याचे मागील काही वर्षात उघड होत आहे. मूळ मालकांना अंधारात ठेवत बनावट मालकांंना उभे करून परस्पर भूखंड विक्री करणाऱ्या काही टोळ्या कार्यरत असल्याचे यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून लक्षात येते. तसाच प्रयत्न सहदुय्यम निबंधक दवंगे यांच्या जागरुकतेमुळे रोखला गेला.

हेही वाचा >>>नाशिक : म्हसरुळमध्ये वृद्धेची हत्या, संशयित ताब्यात

मौजे मखमलाबाद येथील सर्वे क्रमांक ४०७ भूखंड क्रमांक ४६ शी संबंधित हा विषय आहे. संशयितांनी नाशिक बाजार समितीच्या फळ बाजारात हमाली करणाऱ्या मूळ गुजरातच्या कालिदास परमारला भूखंडाचा मूळ मालक गोपाळकृष्ण नायर म्हणून निबंधक कार्यालयात उभे केले. संबंधिताचे त्या नावाचे आधार कार्ड आणि पॅनकार्ड तयार केले. दस्त नोंदणीआधी तपासणी करताना लिहून देणाऱ्याचे नाव गोपालकृष्ण नायर असताना संशयिताची भाषा गुजरातींप्रमाणे वाटली. स्वाक्षरीही त्याच भाषेतील लिखाणासारखी होती. तोंडी प्रश्नांला संशयित समाधानकारक उत्तरे देत नसल्याने संशय बळावला. यावेळी संशयित रवी दोंदे हा त्याची ओळख पटविण्यास पुढे आला. ओळखीची खात्री न पटल्याने दवंगे यांनी पोलिसांंना पाचारण केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.

संशयित परमारने पोलिसांना दिलेल्या जबाबात रवी दोंदेने मूळ भूखंड मालकाच्या नावाने आपले बनावट आधार व पॅनकार्ड बनविल्याची कबुली दिली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात परमार, दोंदेसह दस्तावर ओळख व साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.