नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन आणि जाहीर सभेनिमित्त सकाळी साडेदहाच्या सुमारास आगमन झाल्यावर पंचवटीतील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल मिरची चौकापासून त्यांनी रोड शो केला. या रोड शोप्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो नाशिकरांनी त्यांचे फुले उधळून आणि जय श्रीरामचा नारा देत स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्ली येथून वायू दलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मोदी हे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी हेलिकॉप्टरने पंचवटीतील निलगिरी बाग हेलिपॅडकडे रवाना झाले. हेलिपॅडवर त्यांचे आगमन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते.
हेही वाचा : युवा महोत्सव की धार्मिक महोत्सव?
यानंतर नरेंद्र मोदी यांचा हॉटेल मिरची चौकापासून जनार्दन स्वामी महाराज चौकापर्यंत रोड शो झाला. रोड शोसाठी खास सजविलेल्या वाहनातून पंतप्रधान मोदी, त्यांच्या शेजारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मागे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो नाशिककरांकडून होणाऱ्या स्वागताचा स्वीकार करत होते. नरेंद्र मोदी यांच्या वाहनावर फुलांची उधळण केली जात होती. जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात होत्या. हात हलवून नरेंद्र मोदी हे गर्दीला प्रतिसाद देत होते. सुमारे सव्वा किलोमीटरच्या रोड शोनंतर मोदी हे गोदाकाठी रामकुंडाकडे गोदापूजनासाठी रवाना झाले. गोदापूजनानंतर त्यांच्या हस्ते श्री काळाराम मंदिरात आरती झाली. यानंतर मोदी हे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी तपोवन मैदानाकडे रवाना झाले.
हेही वाचा : मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर सुशोभिकरणासाठी दोन कोटींचा निधी
मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त शहरास पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. ३५० पोलीस अधिकारी व चार हजार पोलीस, पाच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या असा बंदोबस्त तैनात आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने १६ जानेवारीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ड्रोन उड्डाणास प्रतिबंध केला आहे. संपूर्ण जिल्हा नो ड्रोन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.