जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठीचे ३०८.०४ कोटींचे अंदाजपत्रक अधिसभेच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. काटकसरीचे धोरण लक्षात घेऊन गतवर्षाच्या एकूण तरतुदीतून चार कोटी खर्चात कपात करण्यात आली आहे.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित व नवनियुक्त अधिसभा सदस्यांची ही पहिलीच बैठक होती. वित्त व लेखाधिकारी रवींद्र पाटील यांनी अंदाजपत्रक सादर केले. ते सादर केल्यानंतर झालेल्या चर्चेअंती विलास जोशी, नितीन ठाकूर, अमोल मराठे, एकनाथ नेहते यांनी मांडलेल्या कपात सूचना मागे घेतल्या. सर्व सदस्यांनी अंदाजपत्रकावर चर्चा करून मते मांडली.
हेही वाचा – नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर संपकऱ्यांचा मोर्चा; मोर्चेकऱ्यांची आठ किलोमीटर पायपीट
हेही वाचा – धुळे जिल्ह्यात चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश
अंदाजपत्रकात परीरक्षणासाठी २१०.४५ कोटी, योजनांतर्गत विकासासाठी ५६.५१ कोटी आणि विशेष कार्यक्रम आयोजनासाठी ४१.०८ कोटी, अशा सुमारे ३०८.०४ कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. उत्पन्नाची तरतूद २८३.७४ कोटी असल्यामुळे २४.३० कोटी इतक्या तुटीचे हे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. खर्चात बचत करून ही तूट कमी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. गतवर्षी ३३.९१ कोटी तुटीचे अंदाजपत्रक होते; परंतु चालू आर्थिक वर्षात अंदाजपत्रकीय विभागवार आढावा घेतला असता, त्यात सुधारित म्हणून ३१.३८ कोटी तुटीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.