नाशिक – शहरात सुसाट दुचाकी दामटणाऱ्यांसह टवाळखोरांविरुद्ध पोलिसांनी बुधवारी रात्री ठिकठिकाणी कारवाई केली. याअंतर्गत १२० पेक्षा अधिक जणांवर कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत भरधाव वाहन चालविणाऱ्या, कर्कश भोंगे वाजवत टवाळखोरी करणारे, सार्वजनिक ठिकाणी छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. इंदिरा नगर, उपनगर, आसाराम बापू पूल, कॉलेज रोडसह अन्य ठिकाणी कारवाई करण्यात आली. परिमंडळ एकमध्ये टवाळखोरी करणाऱ्या ६८ जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यअंतर्गत, तसेच मोटार वाहन कायद्याअंतर्गत १५८ वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. परिमंडळ दोन अंतर्गत १२० जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत तसेच मोटार वाहन कायद्याअंतर्गत १६९ वाहनधारकांवर कारवाई करुन ४० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
हेही वाचा – नाशिक : सिन्नरमधील अपहृत युवकाची सहा तासांत सुटका
विशेष मोहिमेदरम्यान शहरातील १७० जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच मोटार वाहन कायदा अंतर्गत ३२७ वाहनधारकांवर कारवाई करून एक लाख, २१ हजार रुपये दंड आकारण्यात आला. यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त कर्णिक यांनी दिला.
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
नाशिक पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या भिमचंद्र चंद्रमोरे (४५, रा. मालधक्कारोड) याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या आदेशान्वये मंगळवारी रात्री शहरात सर्वत्र तपासणी करण्यात आली. यावेळी पोलीस रमाबाई आंबेडकर नगर भागात मद्यपींविरुद्ध कारवाई करत असताना संशयिताने पोलिसांना शिवीगाळ आणि दमदाटी करुन सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.