नाशिक : शहराला अवैध फलकबाजी नवीन नाही. याविरोधात कितीही ओरड केली तरी, महापालिका आणि पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने त्यात आता गुन्हेगारी क्षेत्रातील नामचिन गुंडांनी उडी घेतली आहे. सार्वजनिक सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंतीचे निमित्त साधून शुभेच्या देण्यासाठी फलक झळकावले जात असून त्यात गुंडांनाच अधिक स्थान असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सराईत गुन्हेगारांकडून अनधिकृत फलक लावून दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांनी अशा गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिसांनी तडीपार आणि नोंदीतील गुन्हेगारांवर कारवाई करत फलकबाजी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संशयित गुन्हेगार गण्या कावळे उर्फ गणेश वाघ आणि तडीपार गुन्हेगार राकेश कोष्टी यांच्यावर याआधीच गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली अनधिकृत फलक लावले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भूषण लोंढे याच्या वाढदिवसाचे फलकही सिडकोत विविध ठिकाणी लावण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा नोंदवला. मागील आठवड्यात सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर, स्टेट बँक चौक, पाथर्डी फाटा परिसरात सराईत गुन्हेगारांचे मोठ्या प्रमाणावर फलक लावण्यात आले होते. पाथर्डी फाटा, महामार्ग, दिव्या ॲडलॅब सिनेमा, शुभम पार्क रोड आदी ठिकाणी भूषण लोंढे याच्या वाढदिवसाचे फलक दिसल्यानंतर पोलिसांनी या प्रकाराला जबाबदार असलेल्या संबंधितांविरुध्द कारवाई केली.
अनधिकृतरित्या फलक लावून नागरिकांमध्ये अप्रत्यक्ष दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नोंदीतील गुन्हेगारांविधात शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता असे फलक लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. पोलिसांच्या या भूमिकेने शहरात अशा प्रकारांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अंबड पोलिसांनी घेतलेल्या जलद आणि कठोर निर्णयामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीररित्या फलक लावून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना धडा मिळेल, अशी अपेक्षा आहे. अनधिकृत फलक शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचवतात. शिवाय, त्यावरील गुंडांच्या छायाचित्रांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण करतात. त्यामुळे अशा कारवाईची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना, अनधिकृत फलक किंवा गुन्हेगारांचे फलक आढळल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारे दहशत निर्माण करणाऱ्या गोष्टींना शहरात थारा दिला जाणार नाही, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सत्ताधाऱ्यांशी संबंधित संशयितांची फलकबाजी
भाजपच्या विविध आघाड्या आहेत. त्यापैकी नाशिक येथे कामगारांशी संबंधित आघाडीच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात याआधी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे फलक सध्या शहरात काही ठिकाणी लागले आहेत. एकिकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुन्हेगारांना पक्षात स्थान दिले जाणार नसल्याचा दावा करत असताना नाशिकमध्ये पक्षातील अशा प्रवृत्तींविरोधात कोणीच आवाज उठवित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.