मालेगाव – तालुक्यातील पोहाणे येथील सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नऊ वर्षाच्या बालकाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुप्तधनाच्या लालसेतून हा प्रकार घडल्याचा अंदाज करण्यात येत आहे.
कृष्णा सोनवणे हे बालकाचे नाव आहे. त्याचे वडील अनिल सोनवणे हे पोहाणे शिवारात वनखात्याने दिलेल्या जमिनीत वास्तव्यास आहेत. १६ जुलै रोजी दुपारी कृष्णा दोन मित्रांसह घराशेजारी खेळत होता. काही वेळानंतर कृष्णा एका मित्रासह दुसरीकडे निघून गेला. सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने त्याची शोधाशोध सुरु झाली. मात्र त्याचा तपास लागू शकला नाही. त्यामुळे त्याचे अपहरण झाले असल्याची तक्रार वडनेर-खाकुर्डी पोलिसात देण्यात आली. त्याचा शोध सुरु असतानाच गुरुवारी पोहाणे शिवारातील जंगलात एके ठिकाणी त्याचा मृतदेह पुरुन ठेवल्याचे गावकऱ्यांना आढळून आले. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा >>> जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस; सुकी नदीत तरुण बेपत्ता
तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या उपस्थितीत पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. विच्छेदनासाठी धुळ्याच्या वैद्यकीय रुग्णालयात पाठविला. बालकाचा गळा चिरलेला तसेच मृतदेहासोबत एक चाकूही पुरुन ठेवल्याचे आढळून आले. त्यामुळे कृष्णाची हत्या करुन मृतदेह पुरुन ठेवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कृष्णा हा अमावास्येच्या दिवशी बेपत्ता झाला होता. तसेच त्याच्या डोक्यावरचे केसही काढल्याचे आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असण्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला. संशयितांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी श्वान पथक, ठसेतज्ज्ञ तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी पाच पथके गठित करण्यात आली आहेत.
हेही वाचा >>> धुळ्यात रस्त्यांवरील अतिक्रमण हटाव मोहीम
दरम्यान, घटनास्थळावर पुरण्यात आलेल्या वस्तु आणि श्वान पथकाने घेतलेला माग यातून संशयित हे पोहाणे गावातीलच असल्याचे लक्षात आले. वेगवेगळ्या पथकाच्या मदतीने पोलिसांनी उमाजी मोरे (४२) याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रामा मोरे (२५) , रमेश सोनवणे (२१), गणेश सोनवणे (१९) , लक्ष्मण सोनवणे (४५) यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे सांगितले. लक्ष्मण सोनवणे फरार आहे. हा प्रकार गुप्तधनाच्या लालसेपोटी झाला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तपासी पथकाला बक्षीस जाहीर कृष्णा मृत्यू प्रकरणात तपास पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पथकास १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.