सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या गोदामातून साखरेची पोती लंपास करणाऱ्या चार चोरटय़ांना मुद्देमालासह जेरबंद करण्यात नाशिकरोड पोलिसांना यश आले. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर, मागील काही दिवसांत चोरटय़ांची नजर किराणा दुकान व शासकीय गोदामांवर पडली आहे. गोदामातील लंपास केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना संशयितांना पकडण्यात आले.
नाशिकरोडच्या नवले चाळ येथील शासकीय गोदामातून १०५० किलो साखर चोरटय़ांनी लंपास केली होती. प्रत्येकी ५० किलो वजनाचे हे २१ पोते होते. सुमारे १४ हजार रुपये किमतीची साखर चोरीला गेल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घरफोडी, बंद घरांना लक्ष्य करण्याचे प्रकार शहर परिसरात सातत्याने सुरू आहेत. मागील काही दिवसांत चोरटय़ांनी किराणा दुकाने व शासकीय गोदाम फोडून माल लंपास करण्याचे उद्योग सुरू केल्याचे दाखल गुन्हय़ांवरून दिसत होते. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर, किराणा मालाच्या मागणीत प्रचंड वाढ होत असल्याने हा माल बाजारात आणण्याचा चोरटय़ांचा प्रयत्न या प्रकारात निदर्शनास आला. नाशिकरोड रेल्वे स्थानकासमोर रिक्षात साखरेच्या पोत्यांची विक्री होत असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली. त्या वेळी रिक्षात साखरेचे सहा कट्टे आढळून आले.
संशयित मुबतशीर ऊर्फ सोनू बबलू शेख व सलमान रियाजोद्दीन शेख यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविला असता संशयितांनी गुन्हय़ाची कबुली देऊन सागर अरुण जाधव व संकेत शिंदे या दोन साथीदारांची नावे सांगितली. शिवाय, चोरलेली उर्वरित साखरेची पोती आपल्या घरी असल्याची कबुली दिली. संशयितांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी उर्वरित दोन्ही संशयितांना अटक करत सलमान शेखच्या घरातून साखरेची पोती हस्तगत केली. शासकीय गोदामातून साखर गायब करणारा बबलू शेख हा संशयित जेलरोड भागातील, तर उर्वरित तिन्ही संशयित नाशिकरोडच्या डिसलरी क्वॉर्टरमधील आहेत. या कारवाईची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली.
शासकीय गोदामातून साखरेची २१ पोती चोरणाऱ्यांना अटक
नाशिकरोडच्या नवले चाळ येथील शासकीय गोदामातून १०५० किलो साखर चोरटय़ांनी लंपास केली होती.
Written by मंदार गुरव
आणखी वाचा
First published on: 31-10-2015 at 03:02 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested for sugar thief in nasik