नाशिक : सहलीसाठी निघालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाल्याचा बनाव रचून आर्थिक मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून यंत्रणेची धावपळ उडवून देणाऱ्या संशयितास पोलिसांनी मोखाडा भागातून ताब्यात घेतले. रविकांत फसाळे असे संशयिताचे नाव आहे. यापूर्वी त्याने येवला, नागपूर, नंदुरबार या ठिकाणी अपघाताचा बनाव रचून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्याविरुध्द शासकीय सेवकास खोटी माहिती दिल्या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी दुपारी संशयिताने जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या शालेय बसला अपघात झाल्याची माहिती दिली होती. त्यात काही मयत तर, काही जण जखमी झाल्याचे सांगून मुंबई येथील ही बस असून जखमींना तातडीने मदत करावी, अशी मागणी संशयिताकडून करण्यात आली. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन यंत्रणेने छाननी सुरू केली. आपत्ती व्यवस्थापन विभागाने पोलिसांकडून माहिती घेतली. तेव्हा शहरात तसा अपघात झालेला नसल्याचे उघड झाले. त्यामुळे यंत्रणेने पुन्हा संशयिताच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. तेव्हा त्याने आम्ही एसएमबीटी वैद्यकीय रुग्णालयात असल्याचे सांगितले. त्यामुळे इगतपुरीच्या तहसीलदारांना घटनास्थळी जाण्यास सांगण्यात आले. काही वेळात संशयिताने बनाव रचून फसवणुकीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. पोलिसांनी संशयिताच्या भ्रमणध्वनीवरून त्याचा ठावठिकाणा शोधला. पालघरच्या मोखाडा भागातून संशयित रविकांत फसाळेला ताब्यात घेण्यात आले.

संशयिताविरुध्द येवला, नागपूर, नंदुरबारमध्येही गुन्हे

अपघाताची खोटी माहिती देऊन यंत्रणेची दिशाभूल केल्या प्रकरणी संशयित रविकांत फसाळेविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती. गतवर्षी संशयिताने येवला भागात अपघाताची अशीच घोटी माहिती देऊन मदतीपोटी एका राजकीय नेत्याकडून ५० हजार रुपये उकळल्याचे सांगितले जाते. येवला पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. फोनद्वारे संपर्क साधून संशयित डिझेल संपले वा तत्सम कारण देऊन पैसे मागतो. त्याच्याविरुद्ध नागपूर येथील लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. २०२३ मध्ये संशयिताने तसाच प्रकार नंदुरबारमध्ये केला होता. त्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.