नाशिक : येवला तालुक्यातील अंदरसूल शिवारात दुकान फोडणारे चोरटे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

अंदरसूल येथील दुकान फोडून दोन लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल चोरण्यात आला होता. याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा आणि येवला तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन गुन्ह्याची पध्दत, गुन्ह्यातील साक्षीदारांनी संशयितांचे सांगितलेले वर्णन, त्यांची बोलीभाषा यावरून छत्रपती संभाजी नगरारातील सराईत गुन्हेगारांनी ही चोरी केल्याची माहिती मिळवली.

हे ही वाचा…Malegaon Outer : मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघावर दादा भुसेंचं वर्चस्व नेमकं कसं आहे? जाणून घ्या

पोलिसांनी गुलाम शेख (४०, रा. हिदायत नगर), दीपक ठुणे (१९, रा. वांगेभरारी) यांना ताब्यात घेतले. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन, तीन एलईडी टीव्ही, ७७ किलो वजनाची तांब्याची भांडी, १४ किलो वजनाची पितळाची भांडी असा दोन लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्ह्यातील मुख्य संशयित संतोष कांबळे आणि करण कांबळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.