धुळे – चोरी करणारे दोघेच. परंतु, त्यांचा आपसातील समन्वय मजबूत. त्यामुळेच ही जोडी धुळे जिल्ह्यात सहजपणे मोटारसायकलींची चोरी करत असे. चोरलेल्या मोटारसायकलींची संख्या बऱ्यापैकी झाल्यानंतर दोघे त्या आपसात वाटून घेत. धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाच्या पथकाने दोघा चोरांना ताब्यात घेतल्यावर त्यांचा अनोखा समन्वय पाहून पोलीसही थक्क झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळे जिल्ह्यात मोटार सायकली चोरीचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस मोटार सायकल चोरांचा शोध घेण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी माहिती घेत तपासाची सूत्रे हाती घेतली. धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारावर पोलीस पथक सक्रिय झाले. पोलिसांनी पंकज नलावडे (४३, रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, पंचायत समितीपाठीमागे, देवपूर, धुळे) आणि सुरज गवळी (२१, रा. साईबाबा नगर, नकाणे रोड, देवपूर, धुळे) या संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

हे ही वाचा…

प्रारंभी आढावेढा घेणाऱ्या दोघांनाही पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आपण ठिकठिकाणी संयुक्तपणे मोटार सायकली चोरल्याचे सांगितले. चोरलेल्या मोटार सायकलींचे नंतर दोघांत समांतर वाटप केले जात असे. मोटारसायकल चोरीसाठी एम.एच.-१८ बी.वाय.-१४३४ या क्रमांकाच्या सुझूकी मोटार सायकलचा वापर केला जायचा, अशी माहिती संशयितांनी पोलिसांना दिली. चोरी केलेल्या मोटार सायकली विक्री करण्याच्या उद्देशाने धुळ्यात पांझरा नदीकिनारी आणि नकाणे रोड परिसरात काटेरी झुडुपात लपवून ठेवण्यात आल्या होत्या.

दोन्हीही संशयित स्वतःची ओळख लपविण्यासाठी चेहरा कापडाने गुंडाळून चोरी करीत असत. यासाठी मास्टर चावीचा वापर केला जात असे. धुळ्यातील प्रामुख्याने स्वामी नारायण मंदिर परिसर, देवपूर स्टेडिअम, गरुड कॉम्प्लेक्स व ग्रामीण भागातील वर्दळीच्या विविध ठिकाणाहून त्यांनी मोटार सायकली चोरल्याचे या कारवाईतून उघड झाले.

हे ही वाचा…नाशिक: पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला विलंब, रेल्वेला नोटीस

दोन्ही संशयितांकडुन २० मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या असून पैकी पाच मोटार सायकली धुळे शहर पोलीस ठाणे तर चार देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या होत्या.दोन मोटार सायकली पश्चिम देवपूर पोलीस ठाणे आणि धुळे तालुका व मालेगाव येथील छावणी पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येकी एक अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांतील आहेत. अन्य सात मोटार सायकल ीनेमक्या कोणत्या भागातून चोरण्यात आल्या, याची माहिती पोलीस घेत आहेत.

दोन्ही संशयितांकडून एकूण चार लाख १० हजार रुपये किंमतीच्या मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या असून दोघांविरुध्द धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पंकज नलावडेविरुध्द यापूर्वीही मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

हे ही वाचा…धुळ्यात दहशतीसाठी तलवारी, चॉपरचा वापर

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, नितीन दिवसे, अमोल जाधव यांनी ही कामगिरी पार पाडली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested two bike thieves in dhule district sud 02