नाशिक : खाण्याच्या देयकावरून झालेल्या वादानंतर कोयता घेऊन नाशिकच्या उपनगर भागातील सँडी बेकरीत तोडफोड करुन धुडगुस घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी तासाभरात जेरबंद केले. परिसरातून त्यांची वरात काढण्यात आली. नाशिक शहर काही महिन्यांपासून वाढत्या गुन्हेगारीने त्रस्त झाले आहे. भरदिवसा दुकानांमध्ये लूट, व्यावसायिकांकडे खंडणीची मागणी, रस्त्यावर लुटमार, असे प्रकार सातत्याने घडत आहेत.
गुंडांनी कोयते, चाकूचा धाक दाखविणे, वाहनांची तोडफोड करणे, हे प्रकार तर नित्याचे झाले आहेत. हे प्रकार आता नाशिककरांच्याही सवयीचे झाले आहेत. शहरात सत्ताधारी भाजपचे तीनही आमदार असताना ते गुंडगिरीविरोधात गप्प असताना विरोधी पक्षाला जणूकाही याविषयाशी काही देणेघेणेच नसल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे गुंडांचे फावले आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर येथील सँडी बेकरीत संशयितांनी तोडफोड केली.
शनिवारी दुपारी खाण्याच्या देयकावरून दोघांनी दुकानातील कामगारांशी वाद घातला. नंतर ते निघून गेले. काही वेळात ते कोयते घेऊन पुन्हा बेकरीत आले. शिवीगाळ करत त्यांनी काचा फोडल्या. फ्रिजसह अन्य साहित्याची तोडफोड केली. अकस्मात घडलेल्या या प्रकाराने दुकानातील ग्राहक व कामगार बाहेर पळून गेले. संशयितांनी कोयता येऊन परिसरात दहशत पसरवली. या घटनेची माहिती समजताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, शशिकांत पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
दुकानातील सीसीटीव्ही चित्रणातून संशयितांची ओळख पटवली. तासाभराच्या आत संशयित पवन अहिरे (२०, आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉल रोड, जेलरोड) आणि संजय गवळी (२१, एकलहरा ट्रॅक्शन गेट) या दोघांना पकडण्यात आले. पोलिसांनी संशयितांना सँडी बेकरी येथे आणले. बेकरी परिसरासह कॅनॉल रोड, आम्रपाली भागातून त्यांची वरात काढली. बेकरी मालक नवनाथ सोसे यांनी दिलेल्या तक्रारीत संशयितांनी बेकरीत तोडफोड करून गल्ल्यातून पाच हजार ८०० रुपये लंपास केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.