जळगाव : आता सट्टा कशावरही खेळला जाऊ लागला आहे. जळगावच्या भुसावळ तालुक्यात तर कोंबड्यांमध्ये झुंज लावत पैशांची कमाई केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. फळपिकांच्या शेतात चक्क कोंबड्यांची झुंज लावत खेळविणार्या ११ संशयितांच्या पोलीस पथकाने मुसक्या आवळल्या.
पोलिसांच्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कुर्हा येथील गावशिवारातील शेतात कोंबड्यांची झुंज लावत सट्टा खेळवत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांना मिळाली. त्याअनुषंगाने भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बबन जगताप, सहायक निरीक्षक विशाल पाटील, विठ्ठल फुसे, हवालदार सूरज पाटील, संकेत झांबरे आदींच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या.
हेही वाचा…नाशिकमधील वाहतूक कोंडीवर उतारा; ६५.४१ किलोमीटर लांबीचा द्रुतगती परिक्रमा मार्ग प्रस्तावित
पथकाने कुर्हा गावातील रईस बागवान यांच्या लिंबूवर्गीय फळपिकांच्या शेतात छापा टाकला. यावेळी झाडाझुडपांत १५ ते २० व्यक्ती कोंबड्यांच्या झुंजी लावून सट्टा खेळताना दिसून आले. पोलिसांना पाहून काही जणांनी झाडाझुडपांचा आसरा घेत पलायन केले. मात्र, ११ संशयितांना ताब्यात घेण्यास पोलीस पथकाला यश आले. घटनास्थळावरून कोंबड्यांसह १४ दुचाकी, भ्रमणध्वनी संच, असा सुमारे पाच लाख ८६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात संशयित शेख सईद (२३), शेख जावेद (३८), आशिष सोनी (२१), नेल्सन पेट्रो (३१), मोहसीन शेख (३२), शेख सलमान (२३), अर्जुन बादल-गरड (२४), शेख इमाम (३८) आदी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.