शहर परिसरातील एका वित्त कंपनीतील कर्मचाऱ्याने मित्राच्या मदतीने कंपनीच्या तिजोरीतून १२ लाख रुपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अंबड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत संशयितांसह सामान ताब्यात घेतला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील सिडकोतील राणेनगर येथे इक्विटॉस मायको फायनान्स लि. कंपनीची शाखा आहे. कंपनीचे आर्थिक व्यवहार सुरू असताना तिजोरीतील १२ लाख ६६, ८९० रुपयांची रक्कम चोरीस नेल्याचा प्रकार उघडकीस आला. कंपनीच्या व्यवस्थापनाच्या सोनल साखळे यांनी याबाबत कंपनीतील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन या चोरी बाबत विचारणा केली. मात्र कोणीही कबुली दिली नाही. याबाबत अंबड पोलीस स्थानकात उशिराने बुधवारी साखळे यांनी तक्रारही दाखल केली. पोलीस चौकशी सुरू असताना कंपनीतील रथचक्र सोसायटीतील सचिन टेकाळे (२२) आणि अंबड येथील अतुल बापुराव निकम (२१) यांच्यावर संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखविताच दोघांनी आपला गुन्हा कबूल केला.
सचिन आणि अतुल यांनी संगनमत करून ९ नोव्हेंबरच्या रात्री सर्व कार्यालयीन कर्मचारी सायंकाळी घरी परतण्याच्या तयारीत असताना कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने बनावट चावीने तिजोरीतील रक्कम हस्तगत केली. ही रक्कम हाती आल्यानंतर त्यांनी पैसे उडविण्यास सुरुवात केली. दोघांनी चोरीच्या रकमेतून मारुती डिझायनर आणि टाटा विस्टा कार ही वाहने खरेदी केली.
याशिवाय तीन अत्याधुनिक भ्रमणध्वनी खरेदी केले. या सर्व खरेदीतून केवळ ७० हजार रुपये शिल्लक राहिले आहे. पोलिसांनी दोन्ही कार तसेच रोख रक्कम ताब्यात घेतली असून दोघांना आर्थिक फसवणूक, विश्वासघात, घरफोडी कलमान्वये गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा