नाशिक – सिंहस्थ कुंभमेळा उच्चतंत्रानेयुक्त होण्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. कुंभमेळा नियोजनात स्वयंसेवकांची भूमिका महत्वपूर्ण राहणार असल्याने यासाठी शिक्षण विभागाची मदत घेण्यात येत आहे. गुरूवारी येथील आयएमआरटी सभागृहात आयोजित बैठकीत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यासंदर्भात प्राचार्य, मुख्याध्यापक यांचे प्रबोधन केले.

पोलीस आयुक्त कर्णिक यांनी, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी आपण घेणार आहोत, असे सांगितले. कुंभमेळ्यात सुमारे ३० हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहण्याची शक्यता आहे. त्यात काही नाशिकबाहेरील कर्मचाऱ्यांचाही समावेश राहणार असल्याने त्यांना शहराची पुरेशी माहिती नसेल. अशा स्थितीत शहरातील विद्यार्थी बाहेरून येणाऱ्यांना मार्गदर्शन करू शकतात. हे मार्गदर्शन कशा प्रकारे राहील, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येईल. मागील कुंभमेळ्यात पाच हजार स्वयंसेवकांनी काम केले होते. यंदाही यामध्ये महाविद्यालयीन युवकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळेल. यंदाचा कुंभमेळा हायटेक असणार आहे. कुंभमेळ्यासाठी किती लोक, कुठून येणार, याचे निरीक्षण होणार असून बाहेरील वाहनतळ परिसराची जबाबदारी वेगवेगळ्या विभागाकडे राहणार आहे. नियोजनात विद्यार्थ्यांना तीन किंवा चार सत्रात सामील करण्यात येईल. त्यांची कामे, जबाबदाऱ्या, ते काय करू शकतात, यासाठी त्यांना एखाद्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात येईल. गरज पडल्यास आभासी पध्दतीचाही वापर करण्यात येईल, असे कर्णिक यांनी नमूद केले.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य सागर वैद्य यांनी, कुंभमेळा नियोजनाविषयी पोलीस आयुक्तांनी दोन वर्ष अगोदर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर जबाबदारी देण्याविषयीचा निर्णय घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करुन नाशिककर यासाठी सहकार्य करतील, असा आशावाद व्यक्त केला. प्रा. किशोर काळे यांनी वाहनतळाचा मुद्दा उपस्थित केला. बाहेरगावाहून येणारी वाहने वाहनतळात उभी करताना मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे अपघात होऊ शकतो. प्रयागराजसारखी स्थिती नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये उद्भवू नये यासाठी नियोजन करायला हवे, अशी सूचना केली. एआय तंत्राचा वापर करत हरित पट्टा, लाल पट्टा असे वर्गीकरण वर्गीकरण करण्यात यावे, असे सांगितले.

कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी करणे तसेच त्याचा अहवाल वेळोवेळी प्रसिध्द करणे आवश्यक असल्याचे प्रतिमा वाघ यांनी नमूद केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी, विद्यार्थ्यांची मदत त्यासाठी घेण्यात येईल, असे सांगितले. मदतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. आठ ते बारा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ कुंभमेळ्यात उभे राहावे लागते. याअनुषंगाने विद्यार्थ्यांनी तयारी ठेवावी. शहरातील विद्यार्थी या नियोजनात असणे आवश्यक असून मुलींसाठी फक्त सकाळची वेळ देण्यात येईल, असे कड यांनी सांगितले.

नाशिक येथील बैठकीत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कुंभमेळ्यात शिक्षण विभागाची कशी मदत राहू शकेल, यासंदर्भात प्राचार्य, मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन केले.