धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दोन गटांत दगडफेक झाली होती. याप्रकरणी ५८ जणांना अटक झाली असून, त्यांपैकी १६ जणांना पोलीस कोठडी, तर उर्वरित संशयितांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दंगलीतील दोषींवर निश्‍चितच कारवाई होईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.

गावातील एका धार्मिक स्थळाजवळून जळगावातून सप्तशृंगी गडावर पायी दिंडी जात असताना वाद्य वाजविल्याच्या कारणावरून दगडफेक झाली होती. त्यात चार पोलिसांसह सहा जण जखमी झाले. पोलिसांनी दोन्ही गटांतील शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत ८८ जणांना अटक केली. त्यांपैकी १६ जणांना पोलीस कोठडी, तर उर्वरित संशयितांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. गावात गुरुवारीही संचारबंदी लागू होती गुरुवारी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रावले, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, धरणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे आदी ठाण मांडून होते. गावात शांततापूर्ण वातावरण आहे. जळगावातून वणी येथील सप्तशृंगी गडावर जाणार्‍या पालख्या, दिंड्या पाळधी गावातून न नेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी केल्या. त्यामुळे त्या गावाबाहेरून जाणार्‍या महामार्गावरून नेण्यात आल्या.

हेही वाचा >>>जळगाव: सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, गिरीश महाजनांचा काँग्रेस नेत्यांवर घणाघात; जळगावात गौरव यात्रेचा प्रारंभ

दंगलीतील दोषींवर कारवाई होईलच: पालकमंत्री

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पाळधीतील दंगलीवर पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, गावात बत्तीस वर्षांत जातीय दंगल होऊ दिली नाही. मंगळवारी घडलेली दंगल माझ्या जीवनातील सर्वांत वाईट प्रसंग असल्याचे सांगत गैरसमजातून दंगल झाल्याचा दावा केला आहे. पाळधी गावात दर वर्षाला दंगल होत होती. हा पोलीस रेकॉर्ड आहे. मात्र, मी 1992 नंतर या गावात एकही जातीय दंगल होऊ दिली नाही. गावात मुस्लीम समाजबांधव नमाजपठण करीत असताना, बाहेरून पालखी आली. पालखीतील वाद्य आवाज कमी करण्यास सांगितले. त्यातून गैरसमज झाले व त्यातून आमच्या गावात दंगल झाली. प्रार्थनेच्या वेळी वाद्य बंद करण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर ही दंगल घडली. गैरसमजातूनच हा प्रकार घडला आहे. दोन्ही बाजूंकडील लोक हे आपलेच आहेत. त्यामुळे यात जे दोषी असतील, ते सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. दोषींवर निश्‍चित कारवाई होईलच, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader