जळगाव – मुक्ताईनगर यात्रेतील छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सातपैकी चार संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यातील तिघांना भुसावळ येथील अतिरीक्त जिल्हा न्यायालयाने सोमवारी पाच मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर चौथ्या अल्पवयीन मुलाला जळगावच्या बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले. संशयितांमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी मान्य केल्यानंतर शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संशयित कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

मुक्ताईनगरातील कोथळीत सुरू असलेल्या यात्रेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची शुक्रवारी रात्री छेड काढल्याचा प्रकार घडला. सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून अनिकेत भोई, पीयुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई आणि सचिन पालवे या सात संशयितांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, गुन्ह्यास दोन दिवस होऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रविवारी पोलीस ठाणे गाठून अधिकाऱ्यांकडे विचारणा केली होती. राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांसह विरोधी पक्षांच्या सर्वच नेत्यांनी या प्रकरणी टिकेची झोड उठविल्यानंतर रविवारी सायंकाळी किरण माळी, अनिकेत भोई (२६), अनुज पाटील (१९) आणि एक अल्पवयीन अशा चौघांना अटक करण्यात आली. अन्य तीन संशयितांच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.

संशयित शिंदे गटाचे कार्यकर्ते

मुक्ताईनगरातील छेडछाड प्रकरणातील संशयितांपैकी काहीजण शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) गटात असल्याचे मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्यावरील वैयक्तिक आरोप फेटाळून लावले. पीयूष मोरे हा संशयित सध्या शिंदे गटात असला, तरी एकेकाळी तो भाजपमध्येही होता. नगरसेवक म्हणून निवडून आला होता. दोन वर्षांपूर्वी त्याने आमच्या पक्षात प्रवेश केला, असे आमदार पाटील यांनी सांगितले. संशयिताचे एकनाथ खडसे आणि मंत्री रक्षा खडसे यांच्याबरोबर असलेले छायाचित्र आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. या गुन्ह्यातील कार्यकर्ता किंवा पदाधिकारी कोणत्या पक्षाचा आहे, या विषयावर चर्चा करून वेळ वाया घालवण्यापेक्षा दोषींवर कठोर कायदेशीर कशी होईल, यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

Story img Loader