धुळे जिल्ह्यातील देवपूर येथील श्रीराम चौकात एकास लुटणाऱ्या चोरट्याला देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून हिसकावून नेलेली दुचाकी आणि रोकड हस्तगत करण्यात आली आहे. शिवाय, या गुन्ह्यातील आणखी एका संशयिताचा शोध सुरु आहे.
हेही वाचा- जळगाव : कर्जबाजारीपणाला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या
देवपूर परिसरातील स्वामी नारायण मंदिर रस्त्यावरील श्रीराम चौकाकडून योगेश निकम (४३, रा.एकता नगर, बिलाडीरोड धुळे) हे दुचाकीने घराकडे जात असताना दोन चोरट्यांनी निकमला थांबवून बळजबरीने त्यांच्या खिशातील दोन हजाराची रोकड, एटीएम कार्ड, पॅनकार्ड, आर.सी.बुक आणि दुचाकी हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा अक्षय चव्हाण (रा.दैठणकर नगर), अविनाश ऊर्फ गोल्या बोरसे यांनी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांना मिळाली. त्यानुसार शोध पथकाने संशयित अक्षय चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याने निकम यांना लुटल्याची कबुली देत त्यांची दुचाकी पोलिसांना दिली. या गुन्ह्यातील दुसरा संशयित बोरसेचा पोलीस शोध घेत आहेत.