कुणाला काही समस्या आली किंवा सुरक्षेचा कोणता मुद्दा उपस्थित झाला, टवाळखोरांची तक्रार करायची झाली किंवा दारुड्यांचा त्रास होत असल्याची तक्रार करायची असेल तर सामान्यपणे आपण सगळेच जण पोलीस चौकीचा रस्ता धरतो. अशा टवाळखोरांना, बेवड्यांना पोलिसांनी वेसण घालावी अशी आपली अपेक्षा आणि त्यांचं कर्तव्य देखील असतं. पण तुम्ही अशीच एखादी तक्रार घेऊन पोलीस चौकीत गेलात आणि तिथे पोलीसच जर दारूच्या नशेत ‘टाईट’ असतील तर? आता यांची तक्रार कुठे करायची? असाच प्रश्न आपल्याला पडेल. असाच काहीसा प्रश्न मंगळवारी रात्री काही नाशिककरांना पडला. निमित्त झालं गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डी. के. नगर पोलीस चौकीतलं दृश्य!

दारूच्या बाटल्या आणि भरलेले ग्लास!

डी. के. नगर परिसरात रात्रीच्या वेळी काही टवाळखोर व्यक्ती दारुच्या नशेत रस्त्यावर धिंगाणा करत होते. या प्रकाराचा तिथल्या स्थानिकांना त्रास होत होता. त्यामुळे याची तक्रार करण्यासाठी साहजिकच त्यांनी पोलीस चौकी गाठली. पण तिथे दिसलेलं दृश्य त्यांच्या पायाखालची जमीन सरकवणारं ठरलं. कारण चौकीतच टेबलवर दारुच्या बाटल्या, भरलेले ग्लास आणि खायचे पदार्थ ठेवले होते.

डी. के. नगर चौकीमध्ये शिंदे नामक व्यक्ती तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचली असता तिथलं दृष्य पाहून ते संतप्त झाले. त्यांनी या प्रकाराचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावरच अरेरावी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्यामध्ये चौकीतल्या टेबलांवर दारुने भरलेले ग्लास दिसत आहेत. तसेच, चौकीतून बाहेर पळ काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा पाठलाग करून त्याचा व्हिडीओ काढण्यात येत असल्याचं देखील यात दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांवर कारवाई होणार का?

दरम्यान, या सगळ्या प्रकारावरून पोलिसांची प्रतिमा मलीन होत असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.