मकर संक्रांतीच्या दिवशी विविध रंग आणि ढंगातील पतंगांची आकाशात एकच गर्दी होणार आहे. नायलॉन धाग्याच्या विक्रीवर बंदी असल्याने त्याची चोरी-छुपे विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. चायनीज पतंगांऐवजी ग्राहकांनी पूर्वापार चालत आलेल्या धोबी, येवला पतंगींसह प्लास्टिकच्या पतंगींना पसंती दिली आहे. दुसरीकडे तीळ आणि गुळाचे वाढलेले भाव यामुळे अनेकांनी तिळाच्या लाडूला पर्याय म्हणून साखर हलवा, तिळाची पोळी आदी पर्याय स्वीकारला आहे.
मकर संक्रांत म्हणजे बच्चेकंपनीसह आबालवृद्धांसाठी पतंगोत्सवाचा दिवस. दोन दिवसांवर येऊन ठेपलेला सण दणक्यात साजरा करण्यासाठी सर्वाची जय्यत तयारी सुरू आहे. त्याचे प्रत्यंतर पतंग व मांजा खरेदीसाठी सध्या रविवार कारंजा, घनकर लेन, शनिवार पेठ, कानडे मारुती व भद्रकाली परिसरातील प्रमुख दुकानांवर उसळलेल्या गर्दीवर येत आहे. पतंग आणि मांज्याच्या भावात काहीशी वाढ झाली आहे, परंतु पतंगप्रेमींच्या उत्साहावर दरवाढीचा कोणताही परिणाम झाला नाही.
मागील दोन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाने नायलॉन धाग्यावर बंदी घातली आहे. हा धागा इतर धाग्यांप्रमाणे नष्ट होणारा नसल्याने तो पक्ष्यांसाठी धोकादायक असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. मागील काही वर्षांत या धाग्याचे प्रस्थ चांगलेच वाढले होते. त्यामुळे होणाऱ्या दुखापती पाहता तो बाजारातून बाद करण्यासाठी पर्यावरणप्रेमी आग्रही होते. या धाग्याची विक्री आणि वापरावर पूर्णत: र्निबध आणण्यासाठी पोलिसांनी मध्यंतरी कारवाई केली. संक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर, या धाग्याची विक्री होणार नाही, याची दक्षता यंत्रणा घेत आहे. नायलॉन धाग्याचे गंभीर परिणाम आणि कारवाईचे सत्र लक्षात घेऊन ग्राहकांनी अन्य पर्यायांकडे लक्ष केंद्रित केले आहे.
सर्वसाधारणपणे सहा तारी, नऊ तारी व बारा तारी यावरून मांज्याचे दर ठरतात. पांडा हा त्यातील बहुतेकांच्या पसंतीला उतरलेला धागा. १५० ते २५० रुपये रीळ असा त्याचा दर आहे. कधी काळी सर्वाना हवाहवासा वाटणारा बरेली हा प्रति रीळ १२० रुपयांहून पुढे आहे. मैदानी १५० रुपयांपासून उपलब्ध आहेत. पांडा प्रकारातील ‘फरिदबेग’ या सुमारे ४०० रुपये प्रति रीळ दर असणाऱ्या धाग्याला ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याचे विक्रेते सांगतात. बाजारात विविध आकारांतील चिनी पतंगी लक्ष वेधून घेत असल्या तरी नेहमीच्या पारंपरिक पतंगी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. विमान, गरुड, घुबड, साप अशा विविध आकारांतील पतंगी उडविण्यासाठी चांगला वारा आणि मोकळ्या मैदानाची आवश्यकता भासते. त्याद्वारे पतंग उडविल्याचा मनमुराद आनंद लुटता येत नाही, असे काही ग्राहकांचे म्हणणे आहे. विक्रेत्यांनी काही मोजकेच ग्राहक त्याचा विचार करत असल्याचे सांगितले. बरेली, धोबी, येवला या कागदी पतंगांची चलती आहे. बच्चेकंपनीची आवड लक्षात घेता प्लास्टिकच्या पतंगीवर छोटा भीम, छोटा हनुमान, बार्बी, डोरोमन असे कार्टून्स लावण्यात आले आहे. बाजारात सर्वसाधारणपणे दोन रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत कागदी पतंगी आणि कापडी पतंगी ५०० ते १००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. संक्रांतीचा गोडवा वाढविणाऱ्या तीळगुळाला दरवाढीमुळे पर्याय शोधण्याचे काम दुसरीकडे सुरू आहे. तिळाची पोळी, राजगीरा व तीळ यांचे मिश्रण असलेले लाडू सध्या ५० ते १०० रुपये दराने विकले जात आहे. महिला वर्गाने तयार साखर हलवा आणि लाडूला पसंती दिल्याचे चित्र बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे.

Story img Loader