व्याजाने दिलेले अडीच लाख रुपये वसूल करण्यासाठी जिवे मारण्याची सुपारी देण्यात आलेल्या दोघांनी तरुणावर बंदूक रोखून चाकूने वार केले. दोंडाईचा येथील उड्डाणपुलाखाली रविवारी रात्री हा प्रकार घडला असला तरी तिघांविरूद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात दोन दिवसांनी गुन्हा दाखल झाला. पैकी एकास अटक करुन पोलिसांनी त्याच्याकडून एक बंदूक आणि तीन जिवंत काडतूसे जप्त केली आहेत.
हेही वाचा >>> नाशिक: जिल्ह्यात पाच ठिकाणी घरफोडी, लाखो रुपयांचा ऐवज लंपास
याप्रकरणी मेहुल मेसुलिया (२८, रा. सुरत) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अभिषेक गोस्वामी (रा. बेसुरोड, सुरत) याने मेसुलिया यांना व्याजाने दोन लाख ५० हजार रुपये दिले होते. हे पैसे मेसुलिया यांनी आर्थिक अडचणीमुळे परत न केल्याने गोस्वामीने वसुलीची जबाबदारी समाधान राजपूत (रा. दोंडाईचा) आणि सिद्धार्थ उर्फ सिद्धु थोरात (रा. नवसारी,गुजरात) यांच्यावर सोपविली होती. या दोघांना मेसुलिया यांना ठार करण्याची सुपारीही देण्यात आली होती. समाधान आणि सिद्धार्थ या दोघांनी मेसुलिया यांना नंदुरबार चौफुलीवरील पान टपरीवर गाठले. समाधानने त्याच्याकडील बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत सिद्धार्थ उभा असलेल्या उड्डाणपुलाखाली नेले.
हेही वाचा >>> नाशिक: अल्प दरात विमान तिकीटाच्या आमिषाने भुर्दंड, दहा विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक
समाधान आणि सिद्धार्थ यांनी शिवीगाळ करीत अभिषेकचे पैसे न दिल्यास तुला मारण्याची सुपारी आम्हाला देण्यात आली असल्याचे मेसुलिया यांना सांगितले. यावेळी झालेल्या झटापटीत समाधानने मेसुलिया यांच्यावर चाकूने वार केले. मेसुलिया यांनी आरडाओरड केल्यानंतर दोघेही पळून गेले. या तक्रारीवरुन पोलिसांनी अभिषेक गोस्वामी, समाधान राजपूत आणि सिद्धार्थ थोरात या तिघांविरूद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. समाधान यास अटक करून पोलिसांनी त्याच्याकडील बंदूक आणि तीन जिवंत काडतूसे जप्त केले.