पोलीस दलाचे ‘सद्रक्षणाय खल निग्रहणाय’ हे ब्रीद असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र ते सक्रिय राहतात. या कालावधीत त्यांना आपल्या आप्तेष्ट, नातेवाईक, कुटुंबीयांसमवेत कोणत्याही उत्सवाचा आनंद घेता येत नाही. कर्तव्यपूर्ती डोळ्यासमोर ठेवत त्यांचे काम सुरू असते. या परिस्थितीत दैनंदिन कामकाजातून नाशिक पोलिसांनी थोडा वेळ काढत झोपडपट्टी वसाहतीतील वंचित बालके तसेच वृद्धांसाठी दीपावलीचे औचित्य साधत खास उपक्रम सुरू केला. मिष्ठान्न वाटप आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन नागरिक आणि पोलीस यांच्यात संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सध्या दिवाळीची धामधूम सुरू असताना शहरातील झोपडपट्टीसह काही परिसरात काळोख आहे. त्यांच्या घरात दिव्याचा प्रकाश उजळावा, यासाठी ‘परिमंडळ दोन’चे उपायुक्त डॉ. श्रीकांत धिवरे यांनी ही संकल्पना मांडली. मंडळातील उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, अंबड, इंदिरानगर आणि सातपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरातील बालकांसाठी दिवाळी अविस्मरणीय ठरावी यासाठी खास उपक्रम राबविण्यात आले. वंचित बालकांना फराळासह, मिष्ठान्नाचे वाटप करण्यात आले. त्यांच्या मनातील खाकी वर्दीची भीती कमी व्हावी, यासाठी त्यांच्यासोबत लहानपण अनुभवत काही वेळही घालविण्यात आला.
दुसरीकडे आयुष्याची संध्याकाळ वृद्धाश्रमात व्यथित करणाऱ्या सुरकुतलेल्या चेहऱ्यांवर आनंद दिसावा यासाठी त्यांच्या सोबतही काही क्षणांची उसंत घेण्यात आली. यासाठी उपनगर परिसरातील रोकडोबावाडी, देवळाली कॅम्प परिसरातील हिराणी अपंग विद्यार्थ्यांची शाळा, अंबड येथील नाना महाले निराधार केंद्र, इंदिरानगर येथील वडाळा गाव परिसर, सातपूर येथील प्रबुध्दनगर परिसरात पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी खास काही कार्यक्रमांचे आयोजन केले. तसेच नाशिक रोड मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी विशेष कार्यक्रम झाला. यावेळी मुलांना चॉकलेट, बिस्कीट त्यांना आवडेल असा खाऊ तर ज्येष्ठांसोबत गप्पागोष्टीचा आनंद लुटण्यात आला.
यावेळी बालकांसोबत बोलताना त्यांचे भावविश्व जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. रोकडोबावाडी येथील श्रावणी अभ्यासात हुशार असून तिने विविध स्पर्धामध्ये मिळवलेले यश लक्षात घेऊन तिचा पोलीस उपायुक्त धिवरे यांनी आपली ‘हॅट’ आणि ‘केन’ तिला काही वेळासाठी देऊन गौरव केला.
पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून दीपोत्सवात हा उपक्रम सुरू राहणार आहे.

Story img Loader