शहराजवळील गरवारे चौफुलीजवळ कार्यरत वाहतूक पोलिसास कंटेनरने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. अपघातानंतर कंटेनरचालक फरार झाला.

शहर वाहतूक शाखेत कार्यरत नाना भाऊ बागूल (५०) हे मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे चौफुली येथे वाहतुकीचे नियोजन करण्यात मग्न होते. मुंबईकडून येणाऱ्या एका कंटेनरला त्यांनी थांबण्यास सांगितले, परंतु वेगात असलेला कंटेनर त्वरित थांबविण्यात चालकास अपयश आल्याने कंटेनरने बागूल यांना धडक दिली.

बागूल यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे नमूद केले. मूळचे कळवण तालुक्यातील डांगसौंदाण्याजवळील चाफ्याचा पाडा येथील बागूल हे पंचवटीतील मखमलाबादरोड परिसरात राहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे.