Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार संशयित कृष्णा आंधळे नाशिक येथील गंगापूर रोड परिसरात दिसल्याची माहिती काही स्थानिकांनी दिल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. गंगापूररोड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या सहा पथकांकडून स्थानिकांनी सांगितलेल्या भागात तपास करण्यात आला. परंतु, हाती काहीही लागलेले नाही.
गंगापूर रोड परिसरातील सहदेव चौक परिसरातील दत्त मंदिरात हर्षद बनकर हे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी झाडाखाली उभ्या असलेल्या दुचाकीवर दोन जण तोंड झाकताना दिसले. यातील एकाने तोंडावरील कापड खाली केले असता तो कृष्णा आंधळे असल्यासारखा दिसल्याने त्यांनी गंगापूर पोलिसांना माहिती दिली. गंगापूर रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची पाहणी करण्यात आली. आंधळे दुचाकीवर मखमलाबाद परिसराकडे निघून गेल्याचा दावा स्थानिकांनी केला. गंगापूर रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक जगतपथ राजवीर यांनी, सकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास कृष्णा आंधळे याला या परिसरात पाहिल्याचा दावा काही जणांनी केल्याचे सांगितले. त्यानुसार तीन जणांना घेऊन घटनास्थळी पोहचलो. मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी करण्यात येत असल्याचे राजवीर यांनी सांगितले.
दरम्यान, नाशिक पोलिसांच्या वतीने गरज पडल्यास ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली असून ग्रामीण, नाशिक तालुका, पंचवटी, म्हसरूळ पोलिसांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय ज्या ठिकाणी झाडी परिसर आहे, अशा भागातही संशयिताचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.