नाशिक – ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर, शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तसेच टवाळखोर, हुल्लडबाजी करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. यंदा ३१ डिसेंबर आणि नववर्षाचे स्वागत यानिमित्त हाॅटेल आणि बियर बार यांना रात्री उशिरापर्यंत खुले ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांचे काम मात्र वाढणार आहे. मद्यपी, गटागटाने ओरडत फिरणारे टवाळखोर तसेच हुल्लबाज यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मंगळवारी सायंकाळी पाचपासून रात्री उशीरापर्यंत प्रमुख चौकांसह ६० ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार असून वाहन चालकांची अल्कोमीटरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. सुमारे दीड हजारांहून अधिक पोलीस रस्त्यावर तैनात करण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> सुंदर नारायण मंदिर दुरुस्तीचा संथपणा; पुरातत्व विभागाविरोधात स्थानिकांचा रोष
शहरातील मुख्य चौक, महामार्ग, समांतर रस्ते, कॉलेजरोड, गंगापूररोड, त्र्यंबकरोड या ठिकाणांवर विशेष लक्ष पोलिसांकडून ठेवण्यात येणार आहे. याशिवाय शहर परिसरात शोध मोहीमही राबवविण्यात येत आहे. पानटपऱ्या, गोदाम यांची तपासणी केली जात आहे. अमली पदार्थाचा वापर होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. ग्रामीण पोलिसांच्या वतीनेही पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त तैनात करत गस्तीवर भर देण्यात येत आहे.
हेही वाचा >>> धुळ्यात चोरीस गेलेल्या २६ तोळे सोन्याचा मध्य प्रदेशातील जंगलात शोध
नाशिक वाईन केंद्र म्हणून ओळखले जाते. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आठवडाभर आधीपासून दहशतवादविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. नववर्ष स्वागताचा उत्साह पाहता कायदा आणि सुव्यवस्थेला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी तीन हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर बंदोबस्तासाठी उतरणार आहेत. ४०० गृहरक्षक, शीघ्र कृती दल, अमली पदार्थ विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक यांची साथ त्यांना मिळणार आहे. पानटपऱ्या, गोदाम याची तपासणी करण्यात आली असून अमली पदार्थ विक्री, साठवणूकप्रकरणी गुन्हे दाखल असणाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. शहर परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल. – संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त)