महाशिवरात्री दिनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा इशारा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडविरोधात हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या असताना सोमवारी सायंकाळी नाशिक-पुणे महामार्गावर पोलिसांनी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह अन्य महिला कार्यकर्त्यांना रोखत दोन्ही गट समोरासमोर येणार नाहीत याची दक्षता घेतली. या निषेधार्थ ब्रिगेडच्या महिलांनी महामार्गावर काही वेळ ठिय्या दिल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. तत्पूर्वी त्र्यंबकेश्वर येथे महिलांच्या गर्भगृहातील प्रवेशाबाबत सकारात्मक भूमिका घेणाऱ्या साध्वीला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक महिलांच्या संतापाला तोंड द्यावे लागले. या प्रश्नावर घटनेच्या चौकटीत उभयतांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्याचा इशारा दिला होता. त्यांना रोखण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक महिलांनी त्र्यंबकमध्ये जागता पहारा दिला. पहाटेपासूनच भाविकांची गर्दी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यां त्र्यंबकमध्ये पोहोचू नये असे नियोजन केले. नाशिक-पुणे महामार्गावरील नांदूर शिंगोटे येथे सकाळपासून २०० पोलिसांचा ताफा नाशिककडे येणाऱ्या प्रत्येक वाहनावर नजर ठेवून होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास देसाई व इतर कार्यकर्त्यांची वाहने रोखण्यात आली. या वेळी देसाई वाहनातून उतरण्यास तयार नव्हत्या. दरम्यानच्या काळात ब्रिगेडच्या अन्य कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या देत आंदोलन सुरू केले. यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु कोणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर बळाचा वापर करणे क्रमप्राप्त ठरले. सायंकाळी उशिरापर्यंत देसाई वाहनातच बसून होत्या.
दरम्यान, ब्रिगेडला पोलिसांनी अडविल्याचे समजल्यानंतर त्र्यंबकेश्वरवासीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. केवळ प्रसिद्धीसाठी व नागरिकांना वेठीस धरण्यासाठी ब्रिगेड हे उद्योग करत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. ब्रिगेडच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या साध्वी हरिसिद्धिगिरी यांना स्थानिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. त्यांना मंदिर परिसरातून दूर जाण्यास भाग पाडण्यात आले. दर्शनासाठी आलेले वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी हा प्रश्न दोन्ही बाजूंशी चर्चा करून घटनेच्या चौकटीत राहून सोडविला जाईल असे नमूद केले.