नाशिक – सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या वीज जोडणीवरून दुसऱ्या कंपनीने जोडणी घेत सुमारे चार वर्षे स्वत:चे देयक दुसऱ्याला भरायला लावत सुमारे ५० लाखाची फसवणूक केल्या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारात महावितरणचा वायरमन सहभागी असण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.

सातपूर औद्योगिक वसाहतीतील ६८-चार या भूखंड क्रमांकावर हा प्रकार घडल्याचे बिरेंद्रकुमार झा यांनी तक्रारीत म्हटले आहे. या ठिकाणी झा यांची एशियन इको लाईटिंग कंपनी आहे. २०१३ मध्ये त्यांनी एशियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मालकांशी करारनामा करून ही कंपनी घेतली. या कंपनीची संपूर्ण मिळकत आणि वीज जोडणीवर स्वत:चा हक्क प्रस्थापित केला. २०१९ मध्ये भूखंड क्रमांक ६८ ही मिळकत संशयितांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून लिलावात खरेदी केली. नंतर आमच्या वीज जोडणीतून महावितरणच्या कर्मचाऱ्याला हाताशी धरून निलराज इंजिनिअरिंग वर्क्सच्या संचालकांनी जमिनीतून वीज जोडणी करुन घेतल्याचे झा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा >>>जळगाव : मुक्ताईनगरमध्ये गुटखा तस्करी; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

आमची परवानगी न घेता ही वीज चोरी करण्यात आली. त्याचे अंदाजे ५० लाख रुपयांचे वीज देयक आम्हाला भरायला लावत आर्थिक नुकसान केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या संदर्भात झा यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार निलराज इंजिनिअरिंगच्या तीन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारात महावितरणच्या कर्मचाऱ्याचा सहभाग असण्याची शक्यता तक्रारदाराने वर्तविली. या बाबत शंका आल्याने तक्रारदाराने वीज जोडणीची तपासणी केली होती. त्यावेळी भुयारी वीज जोडणीच्या छाननीत हा प्रकार उघड झाला होता. महावितरणला पत्र पाठवून उपरोक्त वीज जोडणी कुणी केली, याची माहिती घेतली जाणार असल्याचे तपास अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस अधिकारी महेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

Story img Loader