नाशिक : शहर परिसराला खासगी सावकारांच्या मगरमिठीतून सोडविण्यासाठी पोलिसांनी आठपेक्षा अधिक जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांविरूध्द तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे. राष्ट्रवादीशी संबंधित वैभव देवरे पाठोपाठ भाजपचा माजी पदाधिकारी कुंडलवार हा वडील आणि भाऊ यांच्याबरोबर खासगी अवैध सावकारी करत असल्याचे उघड झाले. देवरे आणि कुंडलवार यांची कर्जदारांच्या जमिनी, पैसे, मालमत्ता हडप करतांना महिलांवर अत्याचार, विनयभंग करण्यापर्यंत मजल पोहचली. त्यांच्या त्रासाला कंटाळून काहींनी टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर नाशिक पोलीस सजग झाले.
शुक्रवारी सायंकाळपासून पोलिसांनी शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या खासगी सावकारांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. यात काही राजकीय पक्षांशी संबंधित लोकांचा समावेश आहे. पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या सहकाऱ्यांनी सहकार संस्थांचे उपनिबंधक यांच्या मदतीने हे छापे टाकले. नय्या खैरे यांच्याकडील छाप्यात १२ करारनामे, १९ धनादेश आणि काही रोख रक्कम, संजय शिंदे यांच्याकडील छाप्यात कोरा धनादेश, खरेदीखत, खातेवही, पैसे मोजण्याचे यंत्र आढळले. प्रकाश अहिरेकडे २३ नोंदणीवही, कागदपत्रे, चार लाख ५० हजार रुपये रोख, सुनील पिंपळेच्या दोन घरांची आणि तीन दुकानांची झडती घेण्यात आली. ११ खरेदी खत, दोन साठे खत, एक कब्जा पावती, पाच कोरी तिकिटे, २४ कोरे धनादेश, दोन हातउसनवार पावत्या, चार लाख आठ हजार रुपये रोख आढळले.
गोकुळ धाडाकडे ५० उसनवार पावत्या, दोन खरेदी खत, ७० कोरे धनादेश, धनु लोखंडेकडे ५० खरेदी खत आणि १२ धनादेश, राजेंद्र जाधवकडे दोन डायऱ्या आणि दोन लाख ३५० रुपये रोख आढळले. कैलास मैंदकडे दोन कोरे धनादेश, एक करार, नऊ खरेदीखत आढळले. पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी, नय्या खैरे हा माजी नगरसेवक असून गुरूदेव कांदेकडे काही आढळले नसले तरी तो आमदार सुहास कांदे यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले. इतरही काही जण राजकीय पक्षाशी संबंधित असून ही कारवाई यापुढही चालू राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
पोलिसांनी गुरूदेव कांदे, जुबेर पठाण, कैलास मुदलीयार, सचिन मोरे, रोहित चांडोळे यांच्या राहत्या घराची झाडाझडती घेतली असता अवैध सावकारी व्यवसाय करत असल्याचा पुरावा आढळलेला नाही. यापुढेही कारवाई सुरू राहणार असून नागरिकांनी अवैध व्यवसाय विरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
१३ संशयित सावकारांच्या घरी छापे
नाशिक पोलिसांनी १३ संशयित सावकारांच्या घरी, कार्यालयात छापे टाकले. यापैकी आठ जणांविरुध्द वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच ठिकाणी पंचनामे करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा, दोन्ही परिमंडळाचे विभागीय उपायुक्त, पोलीस ठाणेनिहाय अधिकारी, कर्मचारी यांनी ही कारवाई केली. संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त)