काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने जीवनावश्यक वस्तूंसह रसायनांचा बेकायदेशीरपणे साठा करणारे जाळे पोलिसांनी उदध्वस्त केले. याप्रकरणी १५ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून ८४ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> धुळे महापालिकेतर्फे दंडमाफी योजनेला मुदतवाढ
साक्री तालुक्यातील बोडकीखडी शिवारात सतलोज, हॉटेल न्यू कल्याणी आणि हॉटेल सहयोगजवळ पोलिसांनी वेगवेगळ्या वेळेत कारवाई केली. धुळे-सुरत महामार्गावरील बोडकीखडी शिवारातील सतलोज ढाब्याच्या पाठीमागे मोकळ्या जागेत आणि हॉटेल सहयोगच्या आवारात असलेल्या खोल्यांमध्ये काही जीवनावश्यक वस्तू आणि रसायने साठविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री केल्यावर पोलिसांचे पथक दिवसातून तीन वेळा घटनास्थळी धडकले. चालक इमरान शेख मोतीजुद्दीन शेख याने त्याच्या ताब्यातील टँकरमध्ये आर्यन केमिकल ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (हाजिरा,सुरत.गुजरात) येथून मिथाईल मिथाक्रिलेट रसायन भरले होते. कोंडाईबारीतील हॉटेल सहयोगजवळ राहणाऱ्या अक्रम सतार पठाण आणि लालजी सरहूप्रसाद उपाध्याय यांच्याशी संगनमत करून परस्पर काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न केला. ही प्रक्रिया सुरू असतांना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले.
हेही वाचा >>> धुळ्यात महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप
याच महामार्गावरून लोखंड, प्लास्टिक दाणे, खाद्यतेल, इंधनसदृश्य द्रवाची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी साठवणूक केली जात असल्याचा पोलिसांना संशय असल्याने याचीही खातरजमा करण्यात आली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर-पाटील यांच्या विशेष पथकाचे मनोज दुसाने यांनी या प्रकरणी फिर्याद नोंदविली आहे.