नाशिक : शहरातील गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी पोलिसांमार्फत सराईत गुन्हेगारांचा शोध वा अवैध धंद्यांवर शक्यतो रात्रीच्या वेळी कारवाई केली जाते. अनेकदा गुन्हेगार रात्री घरी सापडत नाहीत. ह लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिवसा शोध मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबविण्याची संकल्पना मांडली आहे. त्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रथमच राबविलेल्या विशेष शोध मोहिमेत १५४ सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. अलीकडेच पंचवटी आणि उपनगर परिसरात दहशत माजविणाऱ्या विशाल भालेराव याच्या टोळीतील चार जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या टोळीतील सदस्यांविरोधात पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यात ११ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मार्चमध्ये या टोळक्याने पंचवटीत गावठी बंदूक आणि कोयत्याने एकावर प्राणघातक हल्ला केला होता. तत्पुर्वी सराईत गुन्हेगार गणेश उर्फ छकुल्या वाघमारेला वर्षभरासाठी स्थानबध्द केले होते. त्यानंतर नाशिकरोड परिसरातील कूप्रसिध्द घोड्या तोरवणे याच्यावर पुन्हा एकदा एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> धुळ्यात प्रार्थनास्थळाची विटंबना; पोलिसांचे शांततेचे आवाहन
गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी आता सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आजवर शहर पोलीस रात्रीच्या वेळी गुन्हेगारांची शोध मोहीम राबवित असे. मात्र, तेव्हा गुन्हेगार अपवादाने घरी सापडत असत. हे लक्षात घेऊन मोहिमेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून शहर पोलिसांनी दिवसा ही मोहीम राबवून गुन्हेगारांवर कारवाई केली. शिवाय स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. स्थानिकांकडून गुन्हेगारांच्या ठावठिकाणांची माहिती घेतली गेली.
हेही वाचा >>> नाशिक : पावसाला विलंब झाल्यास शहरात पाणी कपात, जिल्ह्यातील धरणांमध्ये २६ टक्के जलसाठा
या मोहिमेत शहरातील सोनसाखळी खेचणारे, जबरी चोरी, घरफोडी व शरीराविरुध्द वा मालाविरुध्द गुन्हे करणारे पोलीस अभिलेखावरील गुन्हेगारांच्या संभाव्य राहण्याच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे शहर पोलिसांनी म्हटले आहे. उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी आणि गुन्हे शाखा युनिट एक आणि दोनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांची माहिती घेऊन अकस्मात दिवसा ही शोध मोहीम राबविली.
हेही वाचा >>> नाशिक : पाणी टंचाईची झळ; ६६ गावे, ५१ वाड्यांना टँकरने पाणी
त्या अंतर्गत विविध गुन्हे दाखल असणाऱ्या १५४ गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यात आली. तर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांची गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली जात आहे. पुढील काळातही अकस्मातरित्या दिवसा गुन्हेगारांची शोध मोहीम राबविली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या मोहिमेत तीन पोलीस उपायुक्त, पाच सहायक आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व गुन्हे शाखेकडील युनिट एक व दोनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.