महामार्गावर पोलीसही दक्ष
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याच्या भूमाता ब्रिगेडच्या इशाऱ्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे सोमवारी पोलीस यंत्रणेला चांगलीच कसरत करावी लागली. ब्रिगेडच्या महिलांना जिल्ह्याच्या सरहद्दीवर ताब्यात घेण्यासाठी सकाळपासून नांदुरशिंगोटे येथे तैनात असणाऱ्या पोलिसांना सायंकाळपर्यंत तिष्ठत राहावे लागले. दुसरीकडे त्र्यंबकेश्वरमध्ये महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत सकारात्मक भूमिका घेणाऱ्या साध्वीला हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या विरोधात साध्वीने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर संबंधितांनी घोषणाबाजी करत तिला पिटाळून लावले. या घडामोडींमुळे त्र्यंबकेश्वर गावातही गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
शनिशिंगणापूर येथील शनीदेवाच्या चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी महाशिवरात्रीच्या विशेष पर्वाच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्याचा इशारा दिला होता. लगोलग त्यांना मंदिर प्रवेशापासून रोखण्याचे सुतोवाच स्थानिक महिलांसह हिंदुत्ववादी संघटनांनी केले. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या शिवमंदिरात या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. उपरोक्त घडामोडींचा परिणाम भाविकांच्या दर्शनावर होऊ नये यादृष्टीने पोलिसांनी नियोजन केले. त्र्यंबकेश्वर गावात वास्तव्यास असणाऱ्या शेकडो महिला ही प्रथा मोडू नये म्हणून ब्रिगेडच्या विरोधात उभ्या ठाकल्या. त्यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकत्यांनी ठाण मांडून ब्रिगेडचे कोणी मंदिरात जाणार नाही याकडे नजर ठेवली. पोलीस यंत्रणा देसाई यांच्या हालचालींवर नजर ठेवून होती. ब्रिगेडच्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी देसाई यांना जिल्ह्यात येण्यापासून रोखण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे २०० पोलीस कर्मचारी नांदुरशिंगोटे येथे भल्या सकाळपासून महामार्गावर वाहनांवर नजर ठेवून होते. सायंकाळपर्यंत देसाई व त्यांचे कोणी साथीदार या ठिकाणापर्यंत पोहोचले नव्हते. खुष्कीच्या मार्गाने त्या थेट त्र्यंबकेश्वरकडे रवाना होऊ नये याची दक्षता यंत्रणेने घेतली. पण, त्र्यंबकमध्ये वेगळ्याच कारणाने गोंधळ उडाला.
हरिगिरी महाराजांची शिष्या म्हणवून घेणाऱ्या साध्वी हरिसिद्धगिरी सकाळी साडे अकराच्या सुमारास दर्शनासाठी पोहोचल्या. महिलांना गर्भगृहात प्रवेश देण्यास काय अडचण आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यावर हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते व महिला भडकल्या. उभयतांमध्ये यावरून गदारोळ उडाला. मंदिर प्रांगणात साध्वीला धक्काबुक्की करण्यात आली. महिला पोलिसांनी धाव घेऊन त्यांना बाहेर नेले. परंतु, या निषेधार्थ मंदिर विश्वस्त कार्यालयाबाहेर साध्वी उपोषणास बसल्या. ही माहिती समजल्यानंतर स्थानिक महिला आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना पळवून लावले.
प्रत्येक देवस्थानच्या निरनिराळ्या प्रथा-परंपरा असतात. त्याप्रमाणे बारा ज्योतिर्लिगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू महिला व पुरुष यांना प्रवेश आहे. मात्र, गर्भगृहात केवळ सोवळे नसलेल्या अर्धवस्त्रधारी पुरुषांनाच प्रवेश आहे. ही शेकडो वर्षांची परंपरा असून ती कोणाला मोडू दिली जाणार नसल्याचा पवित्रा संबंधितांनी घेतला. केवळ प्रसिद्धी आणि प्रशासन व स्थानिक नागरिकांना वेठीस धरण्यासाठी ब्रिगेड हे उद्योग करत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ब्रिगेडचा इशारा आणि त्यास विरोध करण्यासाठी सज्ज झालेल्या हिंदुत्ववादी संघटना यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महाशिवरात्र वेगळ्याच कारणांनी चर्चेत राहिली.
‘घटनेच्या चौकटीत प्रश्न सोडविला जाईल’
त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात महिलांच्या प्रवेशाबाबतचा प्रश्न घटनेच्या चौकटीत राहून सोडविला जाईल, असे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या मुनगंटीवार यांना त्र्यंबकच्या महिलांनी साकडे घातले. यावेळी त्यांनी या मुद्दय़ावर दोन्ही बाजूंशी चर्चा केली जाईल. त्यात जनमताचा कौल लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे त्यांनी नमूद केले.

Story img Loader