धुळे : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या संशयास्पद मोटारीच्या तपासणीत पोलिसांना ७० लाख रुपयांची रोकड मिळाली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी त्यांच्या पथकाच्या माध्यमातून ही कारवाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीमुळे भरारी पथकांकडून महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर गस्त वाढविण्यासह वाहनांची तपासणी सुरु आहे. या तपासणी मोहिमेत शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई झाली. मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गाने मध्य प्रदेशातील सेंधव्याकडून शिरपूरकडे येणाऱ्या एका मोटारीतून लाखोंची रोकड महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर खात्री झाल्यानंतर पोलिसांनी संशयित मोटार शिरपूर तालुक्यातील पाटील ढाब्यासमोरील गतिरोधकावर थांबवली.

हेही वाचा…महायुती, मविआ दोघांनाही बंडखोरीचा त्रास; समीर भुजबळ, निर्मला गावित, राजश्री अहिरराव यांची उमेदवारी कायम

u

मोटार पोलीस ठाण्यात आणली असता मोटारीत रोकड असल्याची खात्री झाली. यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखालील पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत मोटारीतील डिकीत ठेवलेल्या ७० लाख रुपयांची मोजदाद करण्यात आली. ही रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी संदीप पवार (३३), तुषार साळुंखे (३२) दोघे रा. मोगलाई, साक्री रोड, धुळे, विजय कुलकर्णी (३७, शहादा, नंदुरबार) या तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत संतोष पाटील, संदीप ठाकरे, शेखर बागूल, हवालदार योगेश मोरे, संजय भोई, स्वप्नील बांगर, मनोज पाटील यांचा सहभाग होता.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police seized 70 lakh rupess in suspicious car traveling from mp to maharashtra sud 02