नाशिक : सिन्नर शहरातील लोंढे गल्लीत छापा टाकून पोलिसांनी नऊ किलो गांजा, २२ किलोहून अधिक भांग पावडर असे तीन लाख २६ हजार १४० रुपयांचे अमली पदार्थ आणि रोख रक्कम असा पाच लाख, २३,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोंढे गल्लीत अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी छापा टाकून १६ पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाख २६ हजार १४० रुपयांचा माल आणि रोख रक्कम असा पाच लाख २३ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत १८ जणांना ताब्यात घेण्यात आले.

दुसऱ्या कारवाईत सिन्नर शहरातील उद्योगभवन परिसरातील हॉटेल न्यू सागर लॉजिंग या ठिकाणी विशेष पथकाने छापा टाकत अवैधरित्या सुरू असलेला देहविक्री व्यवसाय उदध्वस्त केला. अक्षय गीते (२४, रा. कानडी मळा) आणि नरेश कच्छवे (३३, रा. भगूर) यांनी आर्थिक फायद्यासाठी पीडितांना पैशांचे आमिष दाखवत देहविक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यांच्याकडून व्यवसाय करून घेतला. तसेच सातपीर गल्लीतील मटका-जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा ७५ हजार ५३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.