नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूूमीवर जिल्ह्यात पोलिसांकडून अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरू आहे. वारंवार कारवाया होऊनही गुजरातमधून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी सुरुच असून दिंडोरी पोलिसांनी सावळ घाटात आठ लाख रुपयांचे मालवाहू वाहन आणि सात लाख २१ हजाराचा गुटखा, असा १५ लाख, २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाई सुरू असताना संशयित पळून गेला.
हेही वाचा…नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण
गुजरातमधून महाराष्ट्रात मालवाहू वाहनातून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तैनात करण्यात आले. पेठ- नाशिक या मार्गावर सावळ घाटाजवळ गोळशी शिवारात मालवाहू वाहन आले असता संशयावरुन पोलिसांनी वाहन अडविले. तपासणी केली असता १२ पोत्यांमध्ये पान मसाल्याची पाकिटे आढळली. याशिवाय सुगंधित तंबाखुचीही पाकिटे आढळली. वाहनासह एकूण १५ लाख, २१ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वाहनचालक फरार झाला आहे.