लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: पोलीस कारवाईत मदत करण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची मागणी करून त्यातील तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना येवला तालुका पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक विजय शिंदे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. शासकीय विभागांमध्ये लाचखोरीची जणू स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. यामध्ये बड्या अधिकाऱ्यांपासून ते वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग मागील काही महिन्यांतील यशस्वी सापळ्यांमधून अधोरेखीत होत आहे.
तक्रारदाराच्या पत्नीने येवला तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून समोरील व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी तसेच तक्रारादाराविरुध्द दाखल अदखलपात्र गुन्हा आणि तक्रार अर्जावरून दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात बक्षिस म्हणून चार हजार रुपयांची लाच सहायक उपनिरीक्षक विजय शिंदे (५१) यांनी मागितली होती. या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. लाचेच्या रकमेपैकी तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना शिंदेला पंचांसमक्ष पथकाने पकडले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. पथकात पोलीस नाईक राजेश गिते, शरद हेंबाडे, अनिल राठोड यांचा समावेश होता.
हेही वाचा… नाशिक : पाणी टंचाईची झळ; ६६ गावे, ५१ वाड्यांना टँकरने पाणी
दरम्यान, मागील काही महिन्यांतील यशस्वी सापळा कारवाईतून शासकीय कार्यालयात कुठलेही काम लक्ष्मीदर्शनाशिवाय होत नसल्याचे दिसत आहे. लाचखोरीत महसूल, पोलीस आघाडीवर असल्याची आकडेवारी आहे. या कारवाईतून शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत.