जळगाव – जिल्ह्यातील चोपडा बस स्थानकात एका शेतकऱ्याचे ३५ हजार रुपये चोरून पळणाऱ्या चार लुटारूंना पोलिसांनी पकडले. त्यांच्या चौकशीत त्यांचा म्होरक्या जालना येथील पोलीस उपनिरीक्षक असल्याचे उघडकीस आल्याने पोलीसही चक्रावले. प्रल्हाद माॅन्टे (५७) असे संशयिताचे नाव असून, तो राज्यभरातील बस स्थानकात चोरीची साखळी चालवत असल्याचा संशय आहे.  चोपडा बस स्थानकात वाळकी येथील शेतकरी वसंत कोळी यांचे ३५ हजार रुपये चोरण्यात आले होते. चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह चोपडा शहर पोलिसांनी मोटारीचा पाठलाग केला.

चोपडा ते धरणगाव रस्त्यावर उपनिरीक्षक प्रल्हाद मॉन्टे याच्यासह श्रीकांत बघे (२७, रा. गोपालनगर. खामगाव), अंबादास साळगावकर (४३, रा. माना, मूर्तिजापूर), रउफ शेख (४८, महाळस, बीड) यांना अटक करण्यात आली. पैकी अंबादास साळगावकर या संशयितावर राज्यभरात २७ गुन्हे दाखल आहेत. श्रीकांत बघे याच्यावर शेगाव येथे गुन्हा दाखल आहे. उपनिरीक्षक प्रल्हाद माॅन्टे हा तीन महिन्यांनी निवृत्त होणार होता. मात्र, त्यापूर्वीच तो चोपडा बस स्थानकात चोरी करण्यासाठी आला होता. पोलिसांकडून पकडले जाऊ नये म्हणून तो कधीही हॉटेल किंवा लॉजवर थांबत नव्हता. त्याच्या मोटारीतून स्वयंपाक बनविण्याचे साहित्य, अंथरूण व पांघरून ताब्यात घेण्यात आले आहे.