लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे निफाड तालुक्यातील चांदोरी येथे होणारा बालविवाह रोखण्यात आला. नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही केली.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने बालविवाहाविरोधात सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी, आजही बालविवाह होतच असल्याचे काही घटनांमधून दिसून येते. निफाड तालुक्यातील चांदोरी येथे एक नवरदेव ओझर येथील अल्पवयीन मुलीशी विवाह करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ओझर पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेत कागदपत्रांची तपासणी केली. त्यावेळी १४ वर्षांच्या मुलीचे लग्न तिच्यापेक्षा १४ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या मुलाशी लावून देण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी बालविवाह रोखत पालकांची समजूत काढली. वयात आल्यानंतर दोघांचा ठरलेला विवाह करण्यास सांगितले. पालकांनीही होकार देत झालेली चूक मान्य केली.
आणखी वाचा-डॉ. रघुनाथ माशेलकर यांनाही ‘गोदावरी गौरव’चे आकर्षण का?
पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनानुसार ओझर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक तुषार गरुड आणि उपनिरीक्षक युगेद्रा केंद्रे यांनी मुलीच्या पालकांसह नातेवाईकांना बालविवाहाचा कायदा समजावून सांगितला. बालविवाह केल्याने होणाऱ्या शिक्षेची जाणीव करुन दिली. बालविवाह न करण्याचे आवाहन केले.