पोलिसांची जनमानसातील प्रतिमा सुधारावी यासाठी शहर पोलिसांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपला जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था केंद्रस्थानी ठेवत पोलिसांनी सायकल गस्तीच्या माध्यमातून वेगळा उपक्रम सुरू केला आहे. या अभिनव संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून या माध्यमातून प्रामुख्याने रस्त्यावरील गुन्हेगारीला प्रतिबंध बसेल तसेच नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवादाची दरी मिटेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी पोलिसांनी थोडय़ाथोडक्या नव्हे, तर ५० नवीन सायकल्स खरेदी केल्या आहेत. याकरिता कुंभमेळ्यात शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही महिन्यांत शहरातील गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहे. सोनसाखळी चोरी, लूटमार, दुचाकी व चारचाकी वाहने लंपास होण्याचे प्रकार, घरफोडी, टवाळखोरांचा धुडगूस, टोळीयुद्ध असे गुन्हे दिवसागणिक वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी तर काटय़ा मारुती पोलीस चौकीत एका तरुणावर हल्ला झाला होता. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा सूर उमटत असताना पोलिसांनी आपापल्या परीने धडपड सुरू केली आहे.
जनमानसातील आपली प्रतिमा सुधारण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. या माध्यमातून जनसामान्यांशी नाते प्रस्थापित करून विश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शांतता समिती, वंचितांसोबत दीपावली सणाचा आनंद लुटणे असे उपक्रम राबविल्यानंतर पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी सहा ते रात्री नऊ या कालावधीत ‘सायकल पेट्रोलिंग’चा उपक्रम हाती घेतला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १३ पोलीस ठाण्यांमार्फत ३६५ दिवस सायंकाळच्या सत्रात नियमित सुरू ठेवण्यात येणार आहे.
यासाठी पोलीस आयुक्तालयाने सिंहस्थ निधीतील शिल्लक राहिलेल्या निधीचा वापर करत ५० नवीन सायकल खरेदी केल्या.
प्रत्येक पोलीस ठाण्याला प्रत्येकी ४ ते ६ या प्रमाणात सायकली देण्यात आल्या आहेत. सायंकाळी पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांसमवेत सायकलींवर स्वार होऊन ज्या परिसरात सातत्याने चोरी, महिलांची छेडछाड वा तत्सम गैरप्रकार होतात, त्या ठिकाणी गस्त घालणार आहेत. याअंतर्गत विविध संवेदनशील भागांत पोलीस अधिकारी व कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नजर ठेवणार आहेत. संशयास्पद वाटणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल. सायकल गस्तीवेळी स्थानिक महिला, युवा वर्गाशी तसेच नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या जात आहेत. या उपक्रमाची सुरुवात परिमंडळ दोनमध्ये पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. पोलिसांनी नागरिकांमध्ये येऊन संवाद साधल्यामुळे सर्वत्र या उपक्रमाचे स्वागत होत आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांना दिलासा मिळाला असून नाव न सांगण्याच्या अटीवर तक्रारी मांडत असल्याचे वरिष्ठांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा