नाशिक : शहर पोलीस दलाला करोनाचा विळखा पडला असून गुरुवारी शहर पोलीस दलातील बिनतारी संदेश यंत्रणेत कार्यरत राजेंद्र भदाणे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शहर पोलीस दलातील करोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आता पाच झाली असून आतापर्यंत २१८ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे.
शहरात करोनाग्रस्तांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. करोनाची साखळी खंडित करण्यासाठी शहर पोलीस रस्त्यावर उतरून कार्यरत आहेत. नियम न पाळणाऱ्या नागरिकांना, वाहनधारकांना करोना संकटाची जाणीव करून देत आहेत. दुकानदारांना शारीरिक अंतर ठेवण्याचे आवाहन करीत आहेत. करोनाचा संसर्ग वाढत असताना पोलिसांनाही त्याचा फटका बसू लागला आहे. शहर पोलीस दलातील २४१ पोलिसांची तपासणी के ली असता २१८ जण करोनाबाधित असल्याचे उघड झाले. २१ पोलिसांचा अहवाल नकारात्मक आला. १६९ पोलिसांनी करोनावर मात के ली आहे. तसेच १७ पोलिसांवर शहर परिसरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ५५ कर्मचाऱ्यांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे. इंदिरा नगर पोलीस ठाण्याचे अरुण टोंगारे, अंबड पोलीस ठाण्याचे सुनील शिंदे आणि विजय शिंपी, नाशिक रोड येथील राजेंद्र ढिकले यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी त्यात राजेंद्र भदाणे यांची भर पडली.
नऊ सप्टेंबर रोजी भदाणे यांना करोना असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. परंतु लक्षणे नसल्याने त्यांनी घरी राहणे पसंत के ले. त्यांना रक्तदाबाचा त्रास होता. तसेच त्यांची हृदयाची शस्त्रक्रि या झालेली होती. १३ सप्टेंबर रोजी त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीवर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भदाणे यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे.